विश्व भारत ऑनलाईन :
प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस आणि एसटी महामंडळाच्या बसमध्ये धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण सतरा प्रवासी जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता पाचगाव बसस्थानकाजवळ घडला.
एमएच४९, जे२३९० ही खासगी तर एमएच४०, एन९००८ क्रमांकाची महामंडळाची एसटी ह्या दोन बसेस उमरेड येथून नागपूरकडे निघाल्या होत्या. दोन्ही बसेस पाचगाव बसस्थानकाजवळ आल्या असता एसटी महामंडळाच्या बसने मागून जोरदार धडक दिली. धडक बसताच खासगी बस बाजूला असलेल्या शेतात घुसली. या अपघातात दोन्ही वाहनातील १७ प्रवासी जखमी झाले.
घटनास्थळी कुही पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाचगाव पोलिस चौकीचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव बोरकर, हरिहर सोनकुसरे, सहायक फौजदार विजय कुमरे, पोलिस अंमलदार पवन सावरकर, दुर्गेश डहाके पोहोचले. जखमी प्रवाशांना त्वरित पाचगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आणि नंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविले, अशी माहिती पाचगावचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही.