विश्व भारत ऑनलाईन :
कोणतीही भाजी असो की बिर्यानी किंवा चौपाटीवर मिळणारी भेळ असो, या सर्व पदार्थांची चव वाढते ती कोथिंबिरीमुळे. सकाळच्या नाशत्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कोथिंबिरीचा वापर हा होतोच. आज हिच कोथिंबिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे.
नाशिक बाजारसमितीत कोथिंबिरीचे भाव कमालीचे कडाडले आहेत. आज लिलावामध्ये कोथिंबिरीला शेकडा 16 हजार रुपये भाव मिळाला आहे. म्हणजेच, कोथिंबिरीची प्रत्येकी एका जुडी ही तब्बल 160 रुपये या किंमतीला खरेदी केली जातीये. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतातला माल मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याचा परिणाम इतर उत्पादनांप्रमाणेच कोथिंबिरीवर देखील झाला आहे.बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक ही कमालीची घटली आहे. इतर भाज्याही कडाडल्या असताना कोथिंबिरी विक्रमी महागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस थांबायला तयार नाहीये आणि म्हणून कोथिंबिरीचं उत्पादन हे दिवसेंदिवस कमी होताना दिसतंय. याचा परिणाम कोथिंबिरीची बाजार समितीमध्ये आवक कमी होण्यावर होतो आहे. यामुळे कोथिंबिरीचे भाव प्रचंड वाढतायेत. गेल्या दोन आठवड्यात हे भाव 10 हजार रुपये , 12 हजार रुपये असे होते. त्यानंतर, ते 14 हजार रुपयांवर आले होते आणि आज ते 16 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. येत्या काळात असाच पाऊस वाढत गेला तर कोथिंबिरीचा भाव वाढत जाईल, असा अंदाज बाजारसमितीने व्यक्त केला आहे.