विश्व भारत ऑनलाईन :
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला. विशेष म्हणजे २० ते २५ कर्मचाऱ्यांनी फक्त तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, लेखी निवेदन दिलेले नाही.
गुरुवारी विमानतळावर औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या स्वागताला प्रोटोकॉलननुसार जे अधिकारी हजर नव्हते त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढल्या. शुक्रवारी काही भागांत गौणखनिज उत्खननाविरोधात कारवाई केली. यापाठोपाठ कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या. पण या घटनांचा व तक्रारींचा काहीही संबंध नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या तक्रारींनंतर एका मंत्र्याने मध्यस्थीसाठी विभागीय आयुक्तांना फोन केल्याचीही माहिती आहे. आयुक्तांनीही काहीही बोलण्यास नकार दिला.
एसडीएम, तहसीलदारांना नोटीस
गुरुवारी भुमरेंच्या स्वागतास जिल्हाधिकारी चव्हाण, प्रोटोकॉल अधिकारी संगीता चव्हाण हजर होते. मात्र तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना त्याच दिवशी नोटीस बजावून गैरहजर राहण्याचे कारण विचारले. शुक्रवारी गांधेली शिवारातील साई टेकडीसमोरील जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली ९ एकर ९ गुंठे डोंगर पोखरणाऱ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करून ३ हायवा एक पोकलेन एक ट्रॅक्टर जप्त केले. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, गौण खनिज अधिकारी किशोर घोडके यांचाही कारवाईत सहभाग होता.
सुट्याही मिळेना,त्रास वाढला
जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक न देता अपमान करतात. सुट्या न देणे, जास्त वेळ उगाच थांबवून घेतात, असे महसूल अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सांगितले आहे. पण ही तक्रार फक्त तोंडी केलेली आहे, लेखी निवेदन दिलेले नाही. आयुक्तांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते.