विश्व भारत ऑनलाईन :
यंदा पाऊस माघारी जाण्यास विलंब लावतोय. रेनकोट घालून तर दिवाळीत फटाके फोडावे लागणार नाही ना, अशी चर्चा आहे.तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे राज्यातून माघार घेत असल्याने विविध जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे.
सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता दिसते.त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची शक्यता खूपच कमी आहे.
बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान बेटाजवळ चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून बेटाच्या पश्चिमेला २० ऑक्टोबरपर्यंत हवेच्या कमी दाबाचे तर धनत्रयोदशीला अतितीव्र कमी दाबाचे (डिप्रेशन) क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोरच्या आग्नेयेला दूर पश्चिम-मध्य समुद्रात दिवाळी पाडवा-भाऊबिजेदरम्यान कदाचित चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. मात्र, त्याचा सध्या तरी महाराष्ट्रावर परिणाम होणार नसून आठ दिवसांनंतर याबाबत चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याचे समजते.
२० ऑक्टोबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होऊन केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि विदर्भात बुधवारपासूनच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.