विश्व भारत ऑनलाईन :
दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करून उदरनिर्वाह करायचा. आपल्याला निसर्गाने भरघोस दिलंय, याचीही प्रचिती तेथील शेतकऱ्यांना नव्हती. तरीही, मनात जिद्द बाळगून परिसरातील ७०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणून ५ गावांमधील पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न शेतकऱ्यांनीच सोडविला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन जलपूजनही केले.
दिवाळीचे औचित्य साधून औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वनगाव-पोहरी येथील शेतकऱ्यांनी ही किमया साधली.
वनगाव पोहरीचे सरपंच एकनाथ जंजाळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र जंजाळ,विश्वास जंजाळ,भास्कर पवार,संतोष मोरे,बाळासाहेब जंजाळ,बाळू पवार,रघुनाथ पाटील,साईनाथ जंजाळ,समाधान पवार,कुणाल पाटील आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.
आनंदोत्सवाची पेरणी
खानदेशातील तापी खोर्यात वाहून जाणारे हक्काचे ३ दशलक्ष घनमीटर पाणी शेतकऱ्यांनी साठवले.
अतिशय डोंगराळ व दुर्गम भागातील वनगाव-पोहरी या गावाचे पाणी वर्षानूवर्षे तापी खोर्यात वाहून जात आहे. त्यातून सिंचनाला अडचणी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या शेतकर्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत ठरते आहे. यासाठी केंद्र शासनाने बळीराजा जलसंजिवनी योजना राबवून सोयगाव तालुक्यातील वनगाव पोहरी, टिटवी, बनोटी, सावळदबारा, देवगाव रंगारी या गावांसाठी निधी उपलब्ध करून दिलाय.त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदोत्सवाची पेरणी झाली आहे.
12 वर्षांपासून प्रकल्प रखडला
वनगाव पोहरी हा जलसिंचन प्रकल्प भूसंपादनामुळे २०१० पासून रखडला होता. आता शेतकऱ्यांच्या पुढाकाराने प्रकल्पासंदर्भातील बऱ्याच अडचणी दूर झालेल्या आहेत. या प्रकल्पात आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीत आनंद झळकत आहे. यासाठी उपअभियंता मिलिंद नाकाडे, कनिष्ठ अभियंता जीवन हजारी, कंञाटदार प्रतिनिधी श्रीराम पवार यांचे सहकार्य लाभले.