विश्व भारत ऑनलाईन :
रेल्वेने प्रवाशांना ऐन दिवाळीत धोका दिलाय. रेल्वे विभागाने मंगळवारी देशभरातील विविध स्थानकांवरून सुटणाऱ्या १७७ प्रवासी रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.रद्द केलेल्या ट्रेनमध्ये पॅसेंजर ट्रेन सह मेल आणि एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. आयआरसीटीसी तसेच रेल्वे तिकीट काउंटर वरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाश्यांना भाडे परतावा दिला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
खराब हवामान आणि रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रद्द करण्यात आलेल्या प्रवासी रेल्वे पैकी ३५ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बिहारसाठी जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे.
देशातील विविध राज्यातील नागरिक त्यांच्या मुळ गावी जात आहेत.अशात रेल्वेतील गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधेसाठी विभागाकडून अनेक विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत.असे असतांनाही प्रवाश्यांना तिकीट मिळत नाहीत, आता या ट्रेन रद्द झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
