विश्व भारत ऑनलाईन :
भंडाऱ्यात गो-तस्करीचे नवे रॅकेट समोर आले आहे. यात 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांने दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आता या प्रकरणी पवनी पोलिसांत 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात 4 डॉक्टर आणि गोशाळेच्या अध्यक्ष सचिवासह 13 संचालकांच्या समावेश आहे.
यात तीन महिलांचा समावेश आहे. पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे बळीराम गौशाळा असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून या गौशाळेत 152 जनावरे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 89 जनावरांची सदर गौशाळेच्या संचालकांनी परस्पर विक्री केली होती. तर, काही जनावरे मृत पावली असता डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची तपासणी न करता पोलिसांना माहिती न देता किंवा शवविच्छेदन न करता परस्पर बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिले होते.
हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्याने सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गोतस्करीमध्ये चक्क पशुवैद्यकीय डॉक्टर समाविष्ट असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात गोतस्करीसाठी पशुवैद्यकीय डॉक्टरवर कारवाई होण्याची ही पहिली वेळ आहे.
गुन्हे दाखल
डॉ तुळशीराम शहारे (45 ), डॉ हेमंतकुमार गभणे (39), डॉ दिनेश चव्हाण, डॉ सुधाकर खूने (64) या चार डॉक्टरांसह बळीराम गौशाळा सिरसाळाचे अध्यक्ष विसर्जन चौसरे (48 ), उपाध्यक्ष विपिन तलमले (35), सचिव मिलिंद बोरकर (38), सहसचिव खुशाल मुंडले (26), कोष्याध्यक्ष विलास तिघरे (45), सदस्य दत्तू मुनरतीवार (50), लता मसराम (52), वर्षा वैद्य (32), माया चौसरे (35), महेश मसराम (27), युवराज करकाळे (38), नानाजी पाटील (52), शिवशंकर मेश्राम (36) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.