विश्व भारत ऑनलाईन :
पंजाबी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाने नवे वळण घेतलेय. यात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सिद्धू मुसेवालांची मानलेली बहिण आणि प्रसिद्ध पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खान हिला गँगस्टर-दहशतवादी सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले आहे. एनआयएने मंगळवारी दिल्लीत अफसानाची पाच तास चौकशी केल्याचे कळते.अफसाना खानच्या चौकशीने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. मुसेवालाची जवळची मैत्रिण असलेल्या अफसाना हिने दिल्लीतील एनआयए मुख्यालयात तिचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे. हत्येत अफसानाची भूमिका असावी, असा संशय तपास यंत्रणेला आहे.
मुसेवालांच्या हत्येनंतर एनआयएने नुकतेच देशात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. हरियाणा, पंजाब आणि दिल्लीचे पोलीस विभाग या प्रकरणात बारकाईने काम करत आहेत. अफसान खान देखील सिद्धू मुसेवालांच्या म्युझिक व्हिडिओचा एक भाग आहे. मुसेवालांनी आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचे अफसाना खानला सांगितले होते.
त्यानंतर आता अफसाना खान एनआयएच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे. अफसानाचे बंबीहा टोळीशी संबंध असल्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप बिश्नोई टोळीवर आहे. बंबीहा टोळी आणि बिष्णोई टोळी एकमेकांचे शत्रू आहेत. मुसेवाला बंबीहा टोळीच्या जवळचा असल्याचे बिष्णोई टोळीचे मत होते.
अफसाना खानने तितिलिया या पंजाबी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्यात सरगुन मेहता आणि हार्डी संधू दिसले होते. अफसाना बिग बॉस 15 चा देखील भाग होती. मुसेवाला यांच्यासोबत अफसानाने गाणी गायली आहेत. अफसाना मुसेवालांच्या खूप जवळच्या होत्या. सिद्धू मुसेवाल तिला आपली जवळची बहीण मानत असे.
सिद्धू मूसवाला खून प्रकरणानंतर गायिका अफसाना खानलाही मानसा पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस दिली होती. पण अफसाना खानने त्यावेळी कुठेतरी बाहेर असल्याचं सांगितलं होतं. सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वयाच्या 28व्या वर्षी मुसेवाला यांनी जगाचा निरोप घेतला. हल्लेखोरांनी AK-47, AK-94 सह इतर शस्त्रांनी सुमारे 30 राउंड गोळीबार केला होता.