एका अधिकाऱ्याची अश्लिल चित्रफीत तयार करून ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीचा चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मंगळवारी रोख ३० हजार व ५ लाखाचा चेक घेताना त्यांना अटक करण्यात आल्याने चंद्रपूरात खळबळ उडाली आहे.
यामध्ये सादीक खॉन, झिबल भारसाखरे यांच्यासह तीन महिला आरोपींचा समावेश आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीद्वारे, काही इसमांनी संगणमत करून त्यांना फ्लॅटवर बोलवून एका महिलेसोबतचे बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफीत तयार केली.
काही दिवसांनी ती रेकॉर्ड केलेली चित्रफीत तक्रारदार यांना पाठवून समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देवून ३ लाखाची खंडणी उकळली होती. त्यानंतरही पुन्हा ती चित्रफीत एका अनोळखी इसमास पाठवून त्याचे मार्फतीने तक्रारदाराला ५० लाखांच्या खंडणीची मागणी करीत आहेत. त्या अनोळखी इसमाने त्याचे मोबाईलवरून तक्रारदाराला त्या चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील स.पो.नि. जितेंद्र बोबडे, मगेश भोयर, संदिप कापडे, पो.उपनि. अतुल कावळे यांचे विशेष पथक स्थापन करून सापळा रचण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून काल मंगळवारी खंडणी बहाद्दर सादीक खॉन, रसिक खॉन पठाण यास तक्रारदाराकडून ३० हजार रूपये रोख व ५ लाखाचा चेक घेताना रंगेहात अटक करण्यात आली. आरोपी सादीक खान याच्या मैत्रीणीने मोबाईलवरून चित्रफितीचे स्क्रिन शॉट उच्चपदस्थ अधिका-यास पाठविले. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी देत पैशाची मागणी करण्यास सांगीतले. याकरिता आरोपीने नवीन सिम कार्ड घेतले व त्या मोबाईल क्रमांकावरून तक्रारदाराचे मोबाईलवर व्हॉट्सअॅप द्वारे चित्रफितीचे स्किन शॉट पाठविले. तसेच प्रसारीत करण्याची धमकी दिली. त्यामुळे आरोपी सादीक खॉन व झिबल भारसाखरे तसेच इतर तीन महिला आरोपींविरोधात चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, निराशा तितरे, सोनाली पेन्दाम यांच्या पथकाने करून खंडणी बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.