नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर खंडणी प्रकरणात अडकल्याने राज ठाकरे यांना धक्का बसलाय. या प्रकरणामुळे मनसेची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. अशा खंडणीखोर पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होऊ शकते.
काही आठवड्यापूर्वी राज ठाकरेंनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली होती.कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. त्यानुसार काल मुंबईत झालेल्या बैठकीत जुन्यांपैकी तिघांना डच्चू देण्यात आला आहे.
विद्यार्थी सेनेचे विदर्भ प्रमुख आदित्य दुरुगकर यांना नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली. नागपूर शहर अध्यक्ष म्हणून विशाल बडगे व चंदू लाडे यांना संधी देण्यात आली आहे़. जुने शहर अध्यक्ष अजय ढोके यांना डच्चू देण्यात आल्याची माहिती आहे़. चंदू लाडे यांच्याकडे पूर्वी पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे विभाग अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती़ आता त्यांना पश्चिम, दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपूर या तीन विधानसभा क्षेत्राकरिता शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
विशाल बडगे यांच्याकडे मध्य, दक्षिण व पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राकरिता शहर अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे़. सध्या फक्त तीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली असून इतर पदाधिकाऱ्यांची नावे, शहर व ग्रामीणची संपूर्ण कार्यकारिणी लवकर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मागील १६ वर्षांत नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षसंघटन पाहिजे त्या प्रमाणात बळकट का झाले नाही, असा सवाल उपस्थित करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १९ सप्टेंबरला नागपूरची कार्यकारिणी बरखास्त केली होती़. घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी घोषित होणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात केली होती़.यानुसार मुंबईत विविध जिल्ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नावे आज घोषित करण्यात आली़.
ग्रामीण जिल्हाप्रमुख व नागपूर शहराच्या दोन शहर प्रमुखांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात ग्रामीणच्या दोन शहरातील एका जुन्या पदाधिकाऱ्याला डच्चू देण्यात आला आहे. १८ व १९ सप्टेंबर अशा दोन दिवसीय नागपूर दौऱ्यात राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला़ होता. यात अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही जुन्या पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी या बैठकीत कार्यकर्त्यांना आपल्या भावना व विचार खुलून व्यक्त करता यावे म्हणून मनसेच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही बैठकीपासून दूर ठेवले होते.
कार्यकर्त्यांचे म्हणणे एकूण घेतल्यावर त्यांनी नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली़. घटस्थापनेला नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागले होते. मनसेचे अनेक पदाधिकारीदेखील मुंबईत ठाण मांडून बसले होते, आज मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्याच्या नवीन कार्यकारिणीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून विद्यार्थी सेनेचे विदर्भ प्रमुख आदित्य दुरुगकर यांना संधी देण्यात आली. तर ग्रामीणमधून सतीश कोल्हे व किशोर सरायकर यांना डच्चू देण्यात आला आहे.
आदित्य दुरुगकरला का झाली अटक?
एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही अन्न व प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी आहोत, असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकानदाराला खरंच अधिकारी असल्याचे समजले. ३० हजार रुपये देण्याची त्याने तयारी दर्शवली. दुकानात धाड पडल्याने गावकरीसुद्धा येथे गोळा झाले होते. या दरम्यान दुकानात नेहमी येणारा डेली कलेक्शन करणारा एक व्यक्ती आला. त्याने अधिकारी असल्याचा पुरावा मागितला. आपले बिंग फुटत असल्याचे बघून दुरुगकर सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. मात्र दुरुगकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी दुरुकरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली. बदनामी टाळण्यासाठी काही प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून प्रकरण दडवण्याचे प्रयत्न केले. एक बडा पदाधिकारी पोलिस उप अधीक्षकाच्या संपर्कात असून गुन्हा दाखल होऊ नये याकरिता दबाव टाकत आहे. दुरुगकर याच्यावर यापूर्वीसुद्धा खंडणी मागण्याचे आरोप आहेत. अलीकडेच मनसेच प्रमुख राज ठाकरे यांनी नागपूर जिल्हा (ग्रामीण) दुरुगकर यास बढती देऊन जिल्हाध्यक्ष केले आहे.