सोलर पॅनलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्याच्या कामासाठी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याने 30 हजारांची लाच घेतली.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास रंगेहाथ अटक केली. चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. बाबूराव विठोबा हंकारे (51) असे अटक केलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे. आरोपी बाबूराव हंकारे महावितरणच्या चिंचवड येथील चाचणी विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग एक पदावर काम करीत होते.
तक्रारदार यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीचे सोलर पॅनलचे मीटरचे तपासणी अहवाल पाठविण्यासाठी हंकारे यांनी 40 हजार लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार, एसीबीने 24 नोव्हेंबर, 21 डिसेंबर आणि 22 डिसेंबर रोजी सापळा रचला. दरम्यान, आरोपी हंकारे यांनी तोडजोड करून 30 हजारांची लाच स्वीकारल्याने अटक केली.