राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बढत्या-बदल्या, चुकीच्या पद्धतीने बदल्या, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती, निकृष्ट दर्जाची कामे असतानाही ठेकेदारांनी बिले देणे, एकाच कामाचे दोन दोन प्रस्ताव तयार करणे अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे पेवच फुटलं असून असून विभागाचे प्रमुखच त्यात बुडाले आहेत. एवढेच नव्हे तर नांदेड हे या भ्रष्टाचाराचे आगार झाल्याचा खळबळजनक आरोप करीत भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सोमवारी विधानसभेत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरील चर्चेदरम्यान प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात चाललेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघड करीत थेट अशोक चव्हाण यांना धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असून या प्रकरणांच्या सखोल चौकशीची मागणी बंब यांनी केलीय.
या विभागाकडे सध्या एक लाख कोटींची काम सुरू असून एकाही रस्त्याचे काम नियमाप्रमाणे आणि मानदंडानुसार नाही. राज्यात कोठेही १०० मीटरचे काम मापदंडानुसार असल्याचे सिद्ध झाल्यास आपण सभागृहात येणे बंद करू, असे खुल्ले आवाहनही बंब यांनी दिले आहे. या रस्त्यांची तपासणी करण्याची हिम्मत मंत्र्यानी दाखवावी, असे सांगून बंबयांनी, या विभागात सध्या प्रामाणिक अधिकारी बाजूला पडले असून मंत्र्याच्या जवळच्या हंडे, राजपूत, नवले, के.टी. पाटील, धोंडगे अशा अधिकाऱ्यांचा बोलबाला असल्याचं सांगितलं आहे.
हांडे यांची नियुक्ती पुण्यात असताना त्यांच्याकडे मुंबई इलाख्याचा कार्यभार कशासाठी तसेच मुख्यमंत्र्याच्या आदेशात फेरफार करण्याची हिंमत दाखविणाऱ्या नाना पवार या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे बंब यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात १० वर्षीपूर्वी झालेली कामे पुन्हा केली जात असून काही ठिकाणी तर एकाच कामाचे दोन प्रस्ताव तयार करून बिले काढली जात असल्याचा आरोप करताना लाचलुचपत प्रतिबंधक प्रकरणातील किती अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या नस्ती बंद केल्यात याचा तपशील देण्याची तसेच विभागातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र दक्षता विभाग करून त्यांना अधिक अधिकार देण्याची मागणी केली.