औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत लघुपाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात बनावट वृक्षारोपण घोटाळा उघडकीस आलेला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
यात 2019 ते 2022 मध्ये विविध कामे करण्यात आली. मात्र,या कालावधीत विविध प्रकल्प, सिंचन वसाहतीवर कोट्यवधीचे बनावट वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मात्र, गोडसेवर अजूनही निर्णय झालेली नाही. कोणताही अहवाल अजूनही केंद्रेकर यांनी सरकारकडे दिलेला नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गोडसे यांच्यासाठी केंद्रेकर बचावात्मक पवित्रा घेत असल्याचे दिसतेय.
प्रकरण काय?
या कामासाठी निविदा काढल्या मात्र वृक्षारोपण कागदावर दाखवून मलाई खाण्यात आली. इतकेच नाही तर एकाच खड्यात दोन झाडे लावण्याचा पराक्रमही गोडसे यांनी केला. यासाठी सर्वस्व जलसंपदा औरंगाबादचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे जबाबदार आहेत, असा आरोप आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून बदली करावी. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असून कोट्यवधीची माया स्वतःच्या घशात ओतण्याचे काम केले जात आहे. सध्या, गोडसे यांची चौकशी सुरु आहे. तरीही, ती चौकशी मॅनेज करण्याचे काम सुरु असल्याचे कळते. तरी गोडसे यांच्यावर निलंबन कारवाई करून तातडीने अन्य जिल्ह्यात बदली करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभा राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.