मकरसंक्रांतीच्या निमित्ताने नागपुरात पतंग शौकीनांच्या आनंदाला उधाण आले. रविवारी सकाळपासूनच आकाशात पतंगांची गर्दी झाली होती. अबालवृद्ध सारेच पतंग उडविण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. उपराजधानीतील प्रत्येक भागात आकाशातील पतंगांच्या गर्दीचे दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. प्रत्येक गच्चीवर सकाळपासूनच अख्खे कुटुंब एकत्रित पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. महिला, युवती पतंग उडविण्याची हौस भागविताना दिसत आहे. पतंग उडवितानाच डीजेच्या तालावर नृत्याचाही आनंद घेत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. शनिवारी आणि शुक्रवारी शहरातील सर्वच बाजारपेठांमधील पतंग व मांजाच्या दुकानांमध्ये गर्दी झालेली दिसली. जुनी शुक्रवारी येथील बाजारात तर पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले.
नायलॉन मांजाचा सर्रास वापर
प्रतिबंधित नायलॉन मांजाला सर्वच स्तरातून विरोध झाला. शाळकरी मुलांनी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथही घेतली. प्रशासनानेही आवश्यक खबरदारी घेतल्याचा दावा केला. आज मात्र स्थिती काही वेगळीच दिसली. पोलिसांनी अगदी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. ड्रोनद्वारे लक्ष ठेवणार असल्याचेही सांगितले होते. पण, या साऱ्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. अगदी बिनधास्तपणे शहराच्या सर्वच भागात नायलॉन मांजानेच पतंग उडविला जात असल्याचे चित्र होते. आनंदाच्या या पर्वादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक नागरिक सतर्क होते. मांजा दिसेल तेथे त्याच्या वापरावर विरोध करण्यावर भर दिल्याचेही दिसले.
शहरातील 12 उड्डाणपूल बंद असून वैद्यकीय सेवा सज्ज आहे.तसेच शहरातील विविध भागात 200 हून अधिक पतंग नायलान मांजासह जप्त करण्यात आल्या आहेत.