✍️मोहन कारेमोरे
शिक्षक मतदार संघाची निवडणूक जवळमोहन येत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने समर्थन जाहीर केले. मात्र, याविषयीची घोषणा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या माध्यमातून करण्यात आली. बैठकीनंतर झालेल्या या घोषणेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने नागपुरात झालेल्या या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर नव्हते. त्यामुळे आमदार आशिष देशमुख यांच्यामार्फत आता नाना पटोले यांना हटविण्याची मागणी केली जात आहे.
याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतील निर्णय माजी क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना जाहीर केला.
नागपूर शिक्षक मतदार संघात काँग्रेसने सुधाकर अडबाले यांना पाठिंबा दिलेला आहे.येत्या 22 जानेवारीपासून आडबाले यांच्या प्रचाराला सुरुवात होईल.विदर्भ काँग्रेसचा गड असून युती सरकारने शिक्षकांचे प्रश्न सोडविलेले नाहीत. त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.