काहीच दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यातील नेरी येथील ५० हून अधिक शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना बुरशीजन्य हरभरा डाळ असलेला ‘आनंदाचा शिधा ‘ वाटप केल्याने खळबळ उडाली होती. मात्र आठ दिवसातच या प्रकाराची पुनरावृत्ती होत असून मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील एका लाभार्थ्याच्या आनंदाच्या शिधा संचातील हरभरा डाळीत चक्क मेलेला उंदीर आणि बुरशीजन्य डाळ प्राप्त झाल्याने आता शिधा धारकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.राज्य सरकार अशाप्रकारचा ‘आनंदाचा शिधा ‘ देवून गोरगरिबांची थट्टा करीत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
मोहाडी तालुक्यातील प्रकार
मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील विजय पुंडलिक भुरे यांना गावातील रास्त भाव दुकानातून आनंदाचा शिधा मिळाला. मात्र शिधा संचातील हरभरा डाळीला बुरशी लागलेली आणि अतिशय दुर्गंध येत असल्याचे विजय भुरे यांनी सांगितले. पहिल्या संच विजय भुरे यांच्या आईने उघडला असता त्यात मेलेला उंदीर होता तर आतल्या डाळीच्या पॅकेटमध्ये बुरशीजन्य डाळ असल्याचे दिसून आले. या प्रकाराच्या पुनरावृत्तीमुळे आता आनंदाचा शिधा वाटप करताना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या ( एफएसएसआयए) नियमांची पूर्तता होत आहे का ? आणि कंत्राटदाराकडे एनएबीएलचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.