‘इथून पुढची सगळी युद्ध ही पाण्याच्या प्रश्नावर होणार असून त्याची सुरुवात पुण्यातून होणार’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.
कुकडीचे पाणी नगरचे भाजपचे मंत्री पळवत असल्याने वळसे-पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
नगर जिल्ह्यातील मंत्री कुकडी प्रकल्पातील पाणी नगर जिल्हयात पळवत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील कुकडी प्रकल्पातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. आज दुपारी वळसे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत कुकडी प्रकल्पाच्या नारायणगाव येथील कार्यालयावर जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसह धडक मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अभियंता गैरहजर
मात्र, कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यादरम्यान कार्यालयात उपस्थित नसल्याने चिडलेल्या वळसे पाटील यांनी अखेर निवेदन देऊन संताप व्यक्त केला. या दरम्यान वळसे पाटील यांनी थेट सरकारला आणि अधिकाऱ्यांना इशारा दिला की, पाणी सोडले तर आम्ही रस्त्यावर उतरु आणि वेळप्रसंगी दोन हात करण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही.
मान्सून लांबल्याने पाणीटंचाई
यंदा मान्सून लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणाचा मुबलक पुरवठा होत नसल्याचं समोर आलं आहे. तसेच शेतकऱ्यांसमोर देखील दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. अशावेळी आता बळीराजासह सर्वसामान्यांचे आकाशाकडे डोळे लागून राहिले आहेत.
विश्वभारत News Website