राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री मिळालेले आहेत. काही बाबतीत प्रशासनातील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. अजित पवार यांच्यासाठी स्वतंत्र बंगला उपलब्ध नाही. त्यामुळे पवारांसाठीही स्वतंत्र बंगला तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे.
सिव्हिल लाइन परिसरात शोध
आदेश आले असून बंगला तयार करण्यासाठी जागेचा शोध सुरू झाला आहे. सिव्हिल लाइन्स परिसरात त्यांच्यासाठी बंगला तयार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ते सामिल झाले. यावेळीही त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.
नागपूरात सीएम व डीसीएमसाठी बंगले
नागपुरात मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी हे शासकीय निवासस्थान आहे. तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. हा बंगला देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी एकच शासकीय निवासस्थान आहे. दोन उपमुख्यमंत्री झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या वेळी त्यांच्यासाठी रविभवन येथील एक कॉटेज राखीव ठेवण्यात आले होते.
राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री
राज्याच्या इतिहासात प्रथमच दोन उपमुख्यमंत्र्यांची पदे निर्माण झाली. त्यामुळे नव्याने उपमुख्यमंत्री पद देण्यात आलेल्या अजित पवारांसाठी स्वतंत्र बंगल्याची सोय नसून रविभवनमधील कॉटेजमध्येच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर शासन स्तरावर मोठी खळबळ उडाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहतीनुसार शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र बंगला तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
प्रशस्त जागा असावी त्यादृष्टीने पाहणी
विधान भवनाच्या दृष्टीने सोयीचे ठरावे व जागा प्रशस्त असावी, अशीही सूचना शासनाकडून बांधकाम विभागाला करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सिव्हिल लाइन परिसरात शासकीय जागा, बंगला बांधकाम विभागाकडून पाहण्यात येत असल्याचे समजते.