स्वातंत्र्यदिनी सायलेन्सरचा जोरदार आवाज करीत हिरोगिरी करणाऱ्या आणि धूम-धडाम असा फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या 48 बुलेट चालकांविरोधात नागपुरातील शहर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी सदर ट्राफिक झोनमध्ये वेगवेगळ्या बुलेट चालकांवर ही धडाकेबाज कारवाई करीत एकूण 48 बुलेट जप्त केल्या. या शिवाय विविध कारणांसाठी इतर 14 अशा एकूण 62 गाड्या जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक नियमांची पायमल्ली करत काही बुलेट चालकांची अरेरावी विविध भागात वाढली आहे. इतरांवर विशेषतः तरुणींवर इम्प्रेशन मारण्यासाठी अनेक तरुण आपल्या वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून आपल्या वाहनाचा आवाज वाढवितात. दुसरीकडे या वाहनांच्या कर्कश आवाजामुळे, नियमबाह्यपणे वाहन चालविल्याने इतर चालकांना वाहन चालविणे कठीण जाते. दरम्यान, काही उद्दाम वाहन चालक मुद्दाम फटाके फोडणारे आवाज काढतात. अचानक होणाऱ्या या आवाजामुळे इतर सहकुटुंब जाणारे वाहनचालक गोंधळण्याची व अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते.
वाहतूक पोलीस एकीकडे हेल्मेट सक्तीसाठी तर कधी सिग्नल मोडला म्हणून आपले वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य सोडून आडोशाला उभे राहून वसुली करतात. मात्र, बेदरकारपणे मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांवर कायम धाक राहण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा या निमित्ताने नागरिकांनी व्यक्त केली आहे.