टेंडर प्रमाणे पुरविलेल्या मटेरियलचे देयके, धनादेश देण्याकरिता बिलामधून टक्केवारी स्वरूपात लाच मागितल्या प्रकरणी एकाच कारवाईत दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात करण्यात आली. कारवाईने एकच खळबळ उडाली असून संदिप सुखदेव दोडके (३०) आंबेनेरी (पद- सरपंच) , रामदास परसराम चौधरी (३९) बोरगाव बुट्टी पो अंबेनेरी (पद सरपंच), हरिष गायकवाड (४५) बोरगाव बुट्टी पो अंबेनेरी ( पद उपसरपंच) ता.चिमूर जी चंद्रपूर असे लाचखोर सरपंच व उपसरपंचाची नावे आहेत.
तक्रारदार हे ठेकेदारी काम करत असून त्यांच्या पत्नीकडे कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र असल्याने त्यांना ग्रामपंचायत आंबेनेरी येथील जिल्हा परिषद शाळा येथे विविध कामाचे मटेरियल पुरवण्याचे टेंडर प्राप्त झाले होते. प्राप्त टेंडर प्रमाणे तक्रारदार यांनी मटेरियल पुरविले. पुरविलेल्या मटेरिअलचे देयके, धनादेश देण्याकरिता आंबेनेरी चे सरपंच दोडके व बोरगाव बुट्टी चे सरपंच चौधरी यांनी तक्रारदार यांना एकूण बिलाच्या ५ टक्के रकमेची पंचासमक्ष लाच रकमेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने ५ सप्टेंबर रोजी पडताळणी केली. दरम्यान १२ सप्टेंबर रोजी सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले असता त्यात आंबेनेरी चे सरपंच दोडके यांनी तडजोडी अंती तक्रारदाराकडून तालुका चिमूर,चंद्रपूर येथे स्वतः करीता २ टक्के व बोरगाव बुट्टीचे उपसरपंच गायकवाड यांचे करीता १ टक्के असे एकूण लाच रक्कम ४१ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना आंबेनेरी चे सरपंच दोडके यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेवून पोलीस स्टेशन चिमूर, जि. चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कार्यवाही राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक, ला .प्र .वि . नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांच्या मार्गदर्शनात व श्रीमती अनामिका मिर्झापुरे, पोलिस उपअधीक्षक, नागपुर परीक्षेत्र,नागपूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, सहा. फौ. सुरेंद्र शिरसाट, पोहवा अनिल बहिरे, पोना अमोल मेंघरे, म ना पोशि अस्मिता मल्लेलवार, चालक पो हवा अश्लेंद्र शुक्ला, शारिक अहमद सर्व ला. प्र. वी. नागपूर यांनी केली.