जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात वीज पडल्यामुळे लिंबाच्या झाडाने पेट घेतल्याने ते जळून खाक झाले.
चाैदा दिवसांच्या खंडानंतर छत्रपती संभाजीनगरला गुरुवारी पावसाने धुऊन काढले. सायंकाळच्या सुमारास सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांत ९७ मिमी धो-धो पाऊस पडला. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या संभाजीनगरकरांना या पावसाने दिलासा मिळाला.
जालना जिल्ह्यातही गुरुवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या. यामुळे सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांना दिलासा मिळाला, तर अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात रात्री ८ वाजेदरम्यान वीज पडून लिंबाचे झाड जळून खाक झाले. विदर्भात अकोला, अमरावती जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार झाले. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागातही दमदार पाऊस झाला.
राज्यात मंगळवारपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
नाशिक | मान्सूनचा आस गुरुवारी (दि.२१) सरासरी जागेपासून दक्षिणेला सरकला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील साडेसात किलोमीटर उंचीचे कमी दाबाचे क्षेत्र झारखंड राज्यासह सभोवताली तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात २६ सप्टेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
तर नागपुरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारपर्यंत असाच मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.