काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. पक्षाच्या सर्व आमदारांशी संपर्क साधण्यात येत आहे. गुरुवारी १५ फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून, सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्या उपस्थिती मंगळवारी प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यामुळे काय परिणाम होईल, आणखी कुणी पक्ष सोडेल का, याची चाचपणी करण्यात आली. चव्हाण यांचे काही समर्थक आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. परंतु बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चेन्निथल्ला यांनी चव्हाण यांच्याबरोबर पक्षातील इतर कोणीही जाणार नाहीत, असा दावा केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व इतर काही नेते पक्षाच्या आमदारांशी संपर्क करीत असल्याचे समजते. गुरुवारी १५ फेब्रुवाराला विधिमंडळ आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली. २७ फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) व शिवसेना ( ठाकरे) गट यांच्या सहकार्याने ही निवडणूक लढविण्याची काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. बैठकीच्या निमित्ताने कोण कुठे आहे, याचीही चाचपणी केली जाणार आहे. राज्यसभा निवडणुकीबाबत बैठकीत रणनीती ठरविली जाणार आहे.
प्रदेश काँग्रेसच्या वतीने १६ व १७ फेब्रुवारीला लोणावळा येथे दोन दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला रमेश चेन्निथला यांचा हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, अशी विविध पदे दिली. परंतु अचानकपणे ते भाजपमध्ये गेले. चव्हाण डरपोक असून मैदान सोडून पळाले. इतकेच नव्हे तर, विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली. चेन्निथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यामुळेकाय पारिणाम होईल, याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांनी दिल्लीत येऊन पक्षाध्यक्ष मलिकार्जून खरगे व इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. परवा मुंबईतील पक्षाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी ईडी, सीबीआयाला घाबरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला का, याची उत्तरे त्यांना जनतेला द्यावी लागतील, असे चेन्निथला म्हणाले.