25 व 26 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला व बुलढाणा हे दोन्ही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उपराजधानीत कमाल तापमानात मात्र सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. तर किमान तापमानही 20 अंश सेल्सिअसच्या जवळ होते. कमाल तापमान हे सरासरीपेक्षा दीड तर किमान तापमान हे सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. मात्र प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, 22 ते 28 फेब्रुवारी या काळात तापमानात थोडीफार घसरण होण्याची शक्यता आहे.
सुमारे एक ते तीन अंशाने कमी होईल. किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास असताना 15 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजाने शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी विदर्भात बऱ्याच ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने उरलेसुरले पीकदेखील हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.