पोळी किंवा भाकरीसोबत झणझणीत अंडाकरीचा स्वाद घ्यायच्या विचारानेच तोंडाला पाणी सुटतं. पण हीच अंडाकरी कोणाच्या आयुष्यातील व्हिलन ठरली तर ? हो, हे खरं आहे.. दिल्ली एनसीआरमध्ये साध्या अंडाकरीमुळे एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, संपलंच ते. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पार्टनरने त्या महिलेकडे अंडाकरीची मागणी केली, पण तिने ती बनवण्यास नकार दिला म्हणून त्याने थेट तिला बेदम मारहाण करून तिचा जीवच घेतला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी इसमाला अटक केली आहे.
आरोपी लल्लन यादव (वय 35) हा मूळचा बिहारचा आहे. सहा वर्षांपूर्वी लल्लनच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अर्थार्जनासाठी तो दिल्ली आला. तेथे आल्यानंतर त्याची पीडित महिलेशी ओळख झाली अन् ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू लागले. मात्र त्याच लिव्ह इन पार्टनरचा लल्लनने खून केला.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, लल्लन यादव (३५) मूळचा बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील अनुराही गावचा रहिवासी आहे. तर अंजली (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत लल्लनने गुन्हा केल्याची कबुली दिली. लल्लन रात्री दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि त्याने त्याची लिव्ह-इन पार्टनर अंजलीला अंडा करी बनवण्यास सांगितले. अंजलीने अंडा करी बनवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने लल्लनने अंजलीला हातोड्याने आणि बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली.
आरोपीच्या पत्नीचा झाला होता मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोप असलेल्या लल्लन याच्या पहिल्या पत्नीचा 6 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीला साप चावला होता. पत्नीच्या मृत्यूनंतर लल्लन दिल्लीत आला. तेथे त्याची अंजलीसोबत ओळख झाली आणि दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. अंजलीची हत्या गुरुग्रामच्या चौमा गावात एका बांधकाम सुरू असलेल्या घरात करण्यात आली. तेथेचे तिचा मृतदेहही सापडला.
घटनेच्या दिवशी लल्लन हा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचला. त्याने अंजली हिला अंडाकरी बनवण्यास सांगितली. मात्र तिने नकार दिल्यावर तो भडकला. रागाच्या भरातच त्याने अंजलीली बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. गंभीर जखमी झालेल्या अंजलीचा मृत्यू झाला. त्यानंतर लल्लन घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर बांधकाम सुरू असलेल्या घराचे मालक तेथे पोहोचले असता त्यांना अंजलीचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवलं, पालम विहार पोलिसांनी तपास करून लल्लनला दिल्लीतील सराय काले खान परिसरातून अटक केली. हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि बेल्टही जप्त करण्यात आला आहे.