मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता सध्या तिच्या आगामी ‘स्ट्रॅटेजी: बालाकोट अँड बियॉन्ड’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. लाराने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. मागच्या काही काळपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असणारी लारा आता कमबॅक करत आहेत. या सीरिजच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत तिने घाणेरड्या कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल तिचं मत मांडलं आहे.
नुकत्याच ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत लाराने नकारात्मक कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल तिला काय वाटतं ते सांगितलं. “वैयक्तिकरित्या मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. मी सोशल मीडियावर तितकीच सक्रिय आहे जितकी मला व्हायचं आहे. जर मला सतत फॉलोअर्स, लाईक्स आणि कमेंट्सची पाहिजे असतील, तर मला त्यासोबत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावं लागेल,” असं लारा म्हणाली.
लाराने फॉलोअर्स कमी असण्याबाबत म्हणाली, “माझ्या सोशल मीडिया फीडमध्ये माझ्यासाठी खास गोष्टी आहेत, या खास गोष्टी जे माझे खरे फॉलोअर्स आहेत त्यांच्यासह मला त्या शेअर करायच्या आहेत. म्हणूनच माझे फारसे फॉलोअर्स नाहीत, पण जे लोक सोशल मीडियावर खरे आहेत, ते कधीच तुम्हाला वाईट बोलणार नाहीत. मला खूप ट्रोलिंग आणि अश्लील कमेंट्ससारख्या गोष्टींना सामोरं जावं लागत नाही, असं मला वाटतं.”
लारा दत्ता म्हणाली, “लोकांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, ते मला म्हातारी म्हणतील, जाड म्हणतील, पण या सर्व गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? मला माहित आहे की ट्रोलिंग करणारे काही नावं नसलेले लोक आहेत आणि ते त्यांच्या आयुष्यात काय करत आहेत हे मला माहित नाही, त्यामुळे मी कोणाबद्दलही बोलू शकत नाही.”
कामाबद्दल बोलायचं झाल्यास लारा लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटात दिसणार आहे. हा ‘वेलकम’ चित्रपटाचा तिसरा भाग आहे. यामध्ये अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, संजय दत्त, अर्शद वारसी, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस व दिशा पाटनी यांच्याही भूमिका असतील.