केंद्रात नवीन सरकार सत्तारूढ होण्याबाबत हालचाली सुरू असताना गुरुवारी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून नागपुरात दाखल झाले आणि त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले.
फडणवीस यांनी अलीकडेच ‘मला सरकारमधून मोकळे करा’ अशी विनंती भाजपश्रेष्ठींकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. सध्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता विकास वर्ग सुरू आहेत. त्यानिमित्त देशभरातील संघाचे पदाधिकारी येथे आले आहेत. फडणवीस गुरुवारी दुपारी नागपुरात आले. धरमपेठ येथील निवासस्थानी गेले. नंतर काही वेळातच संघाचे तीन राष्ट्रीय पातळीवरचे संघाचे पदाधिकारी आले. त्यांनी जवळपास दीड तास फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बुधवारीच दिल्लीला पोहचले. मात्र फडणवीस निकालानंतर दोन दिवसांनी नागपुरात आले आणि ते चार तास थांबून दिल्लीला रवाना झाले. ते संघाचा संदेश घेऊन दिल्लीला गेले अशी चर्चा आहे. मात्र याबाबत भाजप व संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काही माहिती नसल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. दिल्लीला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी स्थानिक आमदार आणि काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी इतकी सोपी नाही. भाजप पदाधिकाऱ्यांना अतिआत्मविश्वास, अहंकार होता. या चुका विधानसभा निवडणुकीत नको, असा सूर उमठत आहे.