कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह 99 उमेदवारांना तिकीट देण्यात आलेली आहे. केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी दिल्लीत सुमारे साडेचार तास खलबते करून देखील शनिवारी जागावाटपाचा तिढा कायम राहिला. त्यामुळे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे मुंबईत जागावाटपावर पुन्हा चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्येही जागांचा गुंता सुटला नाही तर शहांना हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
राज्यातील २८८ जागांपैकी सुमारे २४५-२५० जागांवर भाजप, शिवसेना-शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट या तिन्ही घटक पक्षांमध्ये सहमती झाली आहे. मात्र, अजून ३५-४० जागांवर हे पक्ष तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबर दिल्लीत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीमध्येही या जागांवर अंतिम तोडगा निघू शकला नाही. ‘ज्या जागांवर एकमत झालेले नाही, त्याबाबत आम्ही एकत्रितपणे चर्चा करून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेऊ’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महायुतीतील जागावाटपाबाबत भाजपने कठोर भूमिका घेतली असून १६० जागांपेक्षा कमी जागा लढवण्याची केंद्रातील सत्ताधारी पक्षाची तयारी नसल्याचे समजते. शिंदे व अजित पवार हे दोन्ही नेते अधिक जागांची मागणी करत आहेत. शिंदे गटाने ११५-१२० जागांची मागणी केली होती. पण, ती भाजप मान्य करण्याची शक्यता नसल्याने शिंदे गटाने ८५-९० जागांचा नवा प्रस्ताव भाजपला दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला किमान ६० जागांची अपेक्षा आहे. हे तडजोडीचे प्रस्ताव भाजप स्वीकारण्याच्या मन:स्थितीमध्ये नसल्याचे समजते. दिल्लीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जागांच्या संख्येबाबत चर्चा झाल्याचे कळते. भाजप १६० जागा, शिंदे ७५-८० आणि अजित पवार गटाला ४५-५० जागा मिळू शकतात. अपेक्षेपेक्षा कमी जागा वाट्याला येत असल्यामुळे शिंदे तसेच अजित पवार गटही नाराज असल्याचे समजते.
बैठकीनंतर फडणवीस व अजित पवार दोन्हीही मुंबईला रवाना झाले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतच तळ ठोकून होते. ल्युटन्स दिल्लीतील पंत मार्गावरील मुख्यमंत्र्यांच्या नव्या निवासस्थानातून शिंदे शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास बाहेर पडले. शहांशी बैठक झाल्यानंतरही शिंदे दिल्लीतच खोळंबल्यामुळे तर्कवितर्कही केले जात होते.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही संदिग्धता कायम आहे. मुंबईमध्ये महायुतीने सादर केलेल्या ‘रिपोर्ट कार्ड’च्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे ही निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवली जात असल्याचे सूचित केले. मात्र, भाजपकडून अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मौन बाळगण्यात आले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते असे मानले जात होते. मात्र, भाजपने अधिकाधिक जागा लढवण्याची ठाम भूमिका घेतल्याने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबतही तडजोड करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहांबरोबर झालेल्या बैठकीमध्येदेखील मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समजते. मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा झाली का, या प्रश्नावर, ‘शहांनी आम्हाला टीम म्हणून काम करण्यास सांगितले आहे. राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी आम्ही काम करू’, असे शिंदे यांनी सांगितले.
फडणवीस– शहा चर्चा
दिल्लीत तीनही नेत्यांच्या एकत्रित बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शहांशी स्वतंत्रपणे चर्चा केल्याचे समजते. भाजपला जास्तीत जास्त जागा लढवायच्या असल्यामुळे शिंदे व अजित पवार यांनी जागांबाबत आग्रही भूमिका घेऊ नये, अशी सूचना या दोन्ही नेत्यांना करण्यात आल्याचे समजते. दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री दहानंतर अमित शहांच्या निवासस्थानी शिंदे, फडणवीस व अजित पवार यांची सुरू झालेली एकत्रित बैठक मध्यरात्री अडीचनंतर संपली.