Breaking News
Oplus_131072

मंदिरातील चेंगराचेंगरी चिंताजनक

आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिराजवळ वैकुंठ व्दार दर्शनाच्या टोकन वितरण केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ ला ६ जणांचा मृत्यू झाला तर ४० हुन अधिक गंभीर जखमी झाले.ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.टोकन वितरण केंद्र सकाळी ५ वाजता उघडण्याचे नियोजन होते.यासाठी भाविक रांगा लावू लागले व प्रचंड गर्दी झाली होती.विविध केंद्रावर सुमारे ४००० हजारहून अधिक भाविक रांगेत उभे असल्याचे सांगितले जाते व चेंगराचेंगरीमुळे मोठा गोंधळ उडाला आणि त्यात एका महिलेचा प्रथम मृत्यू झाला व नंतर गंभीर जखमी झालेल्या ५ भाविकांचा मृत्यू झाला अशाप्रकारे ६ भाविकांना चेंगराचेंगरीत आपले प्राण गमवावे लागले.देशात दरवर्षी अनेक ठिकाणी मंदिर परिसर, प्रवचन परिसर, किर्तन परिसर, गर्दीचे ठिकाण,रेल्वे स्टेशन किंवा अन्य ठिकाणी चेंगराचेंगरीचे प्रकार होतांना दिसतात व यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुध्दा झालेली आहे आणि याचे जिवंत उदाहरण आपल्याला आंध्रप्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिराजवळ दिसून आले. चेंगराचेंगरीचे प्रकार का होतात याला मुख्य जबाबदार कोण याचाही विचार आपण सर्वसामान्यांनी, मंदिर प्रशासनाने व स्थानिक प्रशासनाने केला पाहिजे.कारण भाविकांनी भीड करायची व मंदिर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करायचे त्याचे प्रयचित्य भाविकांनी भोगायचे अशी परिस्थिती आज चेंगराचेंगरीच्या प्रकारात दिसून येते म्हणजेच “आ बैल मुझे मुझे मार” अशी परिस्थिती झालेली आहे.भारतातील चेंगराचेंगरीच्या अनेक भयावह घटना झालेल्या आहेत यामध्ये ५ मार्च २०१० ला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ जणांचा मृत्यू झाला.भारतात बऱ्याच ठिकाणी अपुऱ्या आणि पायाभूत सुविधांच्या मर्यादांमुळे असुरक्षितता असते. अनेकदा दुर्गम ग्रामीण भागात, डोंगराळ प्रदेशात, टेकड्यांवर किंवा योग्य मार्ग नसलेल्या नदीकाठावर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. अशा ठिकाणी असलेला तीव्र उतार, स्थळाची असमान भूरचना,अरुंद मार्ग, एकाच ठिकाणी भाविक एकत्रित येणे या कारणांमुळे धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठे धोके निर्माण होतात. त्यातून चेंगराचेंगरीच्या घटना घडतात.धार्मिक किंवा सामूहिक कार्यक्रम घेताना व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करते व दुर्घटना उद्भवतात. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शननं (आयजेडीआरआर)ने प्रकाशित केलेल्या २०१३ च्या अभ्यासात असं दिसून आलं की, भारतातील ७९ टक्के चेंगराचेंगरीचे ठिकाणे हे धार्मिक मेळावे आणि तीर्थयात्रेची ठिकाणे आहेत. विकसित देशांमध्ये बहुतेक चेंगराचेंगरी स्टेडियम, संगीत मैफिली आणि नाईट क्लबच्या ठिकाणी होतात. परंतु भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये गर्दीच्या आणि चेंगराचेंगरीच्या बहुतेक दुर्घटना धार्मिक स्थळांवर होतात, असे केरळ सरकारच्या भू आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे सहाय्यक प्राध्यापक फैसल टी. इलियास यांनी सांगितले. ४ जुलै २०२४ उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन किमान २७ जणांचा मृत्यू झाला,१७ फेब्रुवारी २०२४ उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पूजनीय श्रीजी मंदिरात होळीपूर्वी झालेल्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत किमान सहा भाविक बेशुद्ध पडले तर काही जण जखमी झाले,२४ डिसेंबर २०२३ मथुरा येथील बांके बिहारी मंदिरात गर्दीमुळे गुदमरून दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला,१ जानेवारी २०२२ जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले,२१ एप्रिल २०१९ तामिळनाडूच्या त्रिची येथील मंदिर उत्सवात चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला,१० ऑगस्ट २०१५ झारखंडमधील देवघर शहरातील एका मंदिरात चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू आणि ५० जण जखमी झाले,१४ सप्टेंबर २०१४ आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे ‘पुष्करम’ उत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी जमली होती गोदावरी नदीच्या काठावरील एका प्रमुख स्नानस्थळावर चेंगराचेंगरीत २७ यात्रेकरूंचा मृत्यू आणि २० जण जखमी झाले,२५ ऑगस्ट २०२४ ला मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील एका मंदिरात अफवेमुळे चेंगराचेंगरी झाल्यानं दहा यात्रेकरू ठार आणि २० हून अधिक जखमी झाले,१३ऑक्टोबर २०१३ मध्यप्रदेशातील दातिया येथील रतनगढ मंदिराजवळ चेंगराचेंगरीत ८९ जणांचा मृत्यू आणि १०० हून अधिक जखमी झाले,१४जानेवारी २०११ केरळमधील सबरीमाला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १०६ यात्रेकरू ठार तर १०० हून अधिक जखमी झाले,४ मार्च २०१० उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राम जानकी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ जणांचा मृत्यू झाला, ३०सप्टेंबर २००८ राजस्थानमधील जोधपूरमधील मेहरानगड किल्ल्याच्या परिसरात असलेल्या चामुंडा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत २४४ लोकांचा गुदमरून मृत्यू झाला,३ ऑगस्ट २००६ हिमाचल प्रदेशातील नैना देवी मंदिरात चेंगराचेंगरीत सुमारे १५० भाविकांचा मृत्यू आणि ४०० हून अधिक जखमी झाले,२६ जानेवारी २००५ ला पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई जवळील मंदेर देवी मंदिरात वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या निघाल्यानं घाबरलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली लोक एकमेकांवर पडल्याने २९१ जणांचा मृत्यू झाला तर २०० हून अधिक जण जखमी झाले,२७ ऑगस्ट २००३ नाशिक कुंभातील पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला तर १४०जण जखमी झाले.चेंगराचेगरीच्या भयावह घटना पहाता त्या टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनी किंवा भाविकांनी गर्दीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याठिकाणी आपण जावे की नाही याचा गंभीरतेने विचार करूनच गेले पाहिजे. मंदिर परिसरातील वाढत्या चेंगराचेंगरीच्या घटना पहाता मंदिर प्रशासनावर राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष देण्याची गरज आहे व त्यांच्या चुका उघड करून कारवाई करून त्यात सुधारणा करण्याची आज गरज आहे.यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत होईल व जीवितहानी टाळता येईल.

✍️लेखक

रमेश कृष्णराव लांजेवार

(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

About विश्व भारत

Check Also

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा

हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा टेकचंद्र …

महामार्गावरील प्रवास महागला : नाक्याच्या टोलमध्ये वाढ

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव-नाशिक-गोंदे या टप्प्यातील सहापदरी मार्गावरील वाहनधारकांचा प्रवास आता महागणार आहे. टोलच्या सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *