Breaking News

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोनेरी मुकूट

महसूल मंत्री आणि अमरावती जिल्‍ह्याचे पालकमंत्री म्‍हणून नियुक्‍ती झाल्‍यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुक्रवारी शहरात आगमन झाले. त्‍यांचे ठिकठिकाणी स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यातच माजी राज्‍यमंत्री प्रवीण पोटे यांच्‍या कार्यालयात त्‍यांचा सोनेरी मुकूट घालून सत्‍कार करण्‍यात आल्‍याने चर्चेला उधाण आले.

यापूर्वी प्रवीण पोटे यांनी राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रा.सू. गवई यांचा सन्‍मान करताना सोनेरी मुकूट भेट म्‍हणून दिल्‍याची आठवण अनेक जण सांगतात. शुक्रवारी बावनकुळे हे भाजपचे शहराध्‍यक्ष प्रवीण पोटे यांच्‍या जनसंपर्क कार्यालयात पोहचले, तेव्‍हा त्‍यांचे कार्यकर्त्‍यांनी स्‍वागत केले. प्रवीण पोटे यांनी त्‍यांना सोनेरी मुकूट भेट म्‍हणून दिला. यावेळी आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर, आमदार राजेश वानखडे, आमदार केवलराम काळे, प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी, दिनेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. त्‍यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांना या सोनेरी मुकुटाबद्दल विचारणा करण्‍यात आली. त्‍यावेळी बावनकुळे यांनी हा मुकूट सोन्‍याचा नसून पितळी असल्‍याचे स्‍पष्‍टीकरण दिले. त्‍यावेळी खुद्द प्रवीण पोटे यांनीही त्‍यावर प्रतिसाद दिला. पण, या सोनेरी रंगाच्‍या मुकुटाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्‍याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार रवी राणा यांच्‍या निवासस्‍थानी भेट दिली. या ठिकाणीही त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी माजी खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, उमेश यावलकर आदी उपस्थित होते.

अमरावतीचा पालकमंत्री झाल्याबद्दल आपल्‍याला आनंद होत आहे त्यामुळे आमदार रवी राणा, नवनीत राणा तसेच जिल्ह्यातील आमदारांनी अमरावती जिल्ह्याच्‍या विकासाचा आराखडा मला द्यावा, मी निश्चितच अमरावती जिल्ह्याच्‍या विकासासाठी जास्तीत जास्त निधी शासनाकडून खेचून आणण्‍याचा प्रयत्‍न करेन, असे आश्‍वासन बावनकुळे यांनी दिले.

बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थांनच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी वैद्य यांनी बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती देऊन सत्कार केला. बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन त्‍यांचे कौतुक केले.

बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही जबाबदारी आपली असल्याचे सांगितले. यावेळी आश्रमाच्या वतीने बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

About विश्व भारत

Check Also

अहमदाबाद विमान अपघातासाठी प्रफुल्ल पटेल जबाबदार : नाना पटोलेंचा गंभीर आरोप

तत्कालिन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत …

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *