नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ठाकरे आणि फडणवीस यांची मैत्री नागपुरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
आमदार विकास ठाकरे यांनी स्थानिक समस्येबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे नगरसेवक वासिम खान, नगरसेविका सय्यदा निजामुद्दीन अन्सारी यांच्यासह समस्याग्रस्त नागरिक उपस्थित होते. प्रभाग ८ मधील डोबीनगर झोपडपट्टी हटविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येथील सातशे कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. ही कारवाई रोखण्यात यावी आणि येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशा मागण्या आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या.
नगरसेवक वासिम खान व नगरसेविका सय्यदा निजामुद्दीन अन्सारी यांनी डोबीनगर रहिवाशांसोबत आमदार ठाकरे यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले होते. मुख्यमंत्री फडणवीस दुपारी रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात होते. आमदार ठाकरे यांनी लगेच नगरसेवक व काही नागरिकांसह येथेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे व वासिम खान यांनी रेल्वेकडून डोबीनगर झोपडपट्टी हटवण्यासाठी येत्या ३ जूनपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्याना सांगितले.
या झोपडपट्टीत जवळपास सातशे घरे आहेत. रेल्वेने कुठलेही सर्वेक्षण न करता तसेच सुनावणी न घेता नोटीस बजावली आहे. पुनर्वसनाबाबतही येथील नागरिकांना आश्वस्त केले नाही. रेल्वेच्या या कारवाईमुळे हजारो नागरिक बेघर होण्याची शक्यता असून ही कारवाई रोखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिले. यावेळी आमदार विकास ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस हास्य विनोदातही रंगले. त्यांचे फोटोही शहरात व्हायरल झाले. त्यामुळे दोघांच्या भेटीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली. आमदार विकास ठाकरे १३ वर्षे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्याऐवजी कॉंग्रेसने शहराध्यक्षपदाची जबाबदारी प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याकडे सोपवली.
१० हजार नागरिक बेघर होण्याची शक्यता
रेल्वेने डोबीनगर झोपडपट्टीतील १४० कुटुंबांना घर खाली करण्याबाबत नोटीस बजावली. येथील सर्व घरे तोडली जातील, अशी शक्यता आहे. यामुळे १० हजार नागरिक बेघर होण्याची भीती नगरसेवक वासिम खान यांनी बोलून दाखवली.
विश्वभारत News Website