रुग्णालयात स्वतंत्र माहिती कक्ष उभारण्याचा निर्णय
◾वरोरा, भद्रावती, राजुरा,ब्रह्मपुरी व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी 50 आयसीयू बेड, व 50 ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेड तसेच दोन डॉक्टर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार
◾ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वुमन हॉस्पिटल मध्ये 100 बेड नव्याने उभे करणार
चंद्रपूर :
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना आपत्ती काळात डॉक्टरांनी सेवा देण्यास नकार दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिलेत.
पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. कोरोना संसर्गाच्या काळामध्ये नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहनही ना. वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी निवडणूक संपत खलाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस. एन. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, मनपा सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, प्रामुख्याने उपस्थित होते.
मनुष्यबळ, यंत्रसामग्री, औषधे साहित्य याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच खाजगी एजन्सीकडून मनुष्यबळ मागवा.त्यासोबतच प्रत्येक रुग्णालयात मोफत इंजेक्शन, औषधे कमी पडता कामा नये अशा स्पष्ट सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या.
वरोरा, भद्रावती, राजुरा,ब्रह्मपुरी व बल्लारपूर या तालुक्याच्या ठिकाणी 50 आयसीयू बेड, व 50 ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेड तसेच दोन डॉक्टर्स या ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून वुमन हॉस्पिटल मध्ये 100 बेड नव्याने उभे करणार असल्याचे माहिती ना. वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
प्रत्येक रुग्णांची माहिती देणारे माहिती कक्ष 24 तास उपलब्ध राहणार असून रुग्णांच्या वार्ड संबंधी माहिती दर्शविणारे फलक, माहिती कक्षात एक स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहे. सर्व रुग्णांची माहिती वेळेत मिळावी यासाठी अद्यावत पोर्टल सुद्धा उपलब्ध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे.