दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी
* दफ्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर व मानसिक छळापायी मुलीची आत्महत्या
राजुरा, वार्ताहर –
कर्तव्यात कसूर करून वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडून मृतक मुलीचा व तिच्या कुटुंबाच्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, मृतक प्रकल्पग्रस्त मुलीच्या कुटुंबाला वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड व सरकारने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि मृतक मुलीचे आई-वडील ज्या अज्ञान मुलीचे नॉमिनेशन सादर करतील, तिला सज्ञान झाल्यावर तात्काळ नोकरीत सामावून घेण्याचे अभिवचन क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयाने द्यावे, अशा तीन प्रमुख मागण्या शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप व शेतकरी संघटनेने मा.केंद्रीय कोळसा खाण मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख आणि वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ( सीएमडी )यांचेकडे केल्या आहेत.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रा अंतर्गत पोवनी 3 या कोळसा खाण प्रकल्पासाठी जमिन भूअर्जनाची प्रक्रिया बऱ्याच आधी पूर्ण झाली आहे. भूमीचे ताबेही दोन वर्षांपूर्वीच देण्यात आले असून मृतक मुलीच्या वडिलांना नुकसान भरपाई ही आधीच देण्यात आली आहे. मुळात मृतक मुलीच्या आईचे नाव मूळ महसूल खात्यात मालकाच्या रकान्यात कुठेही दर्ज नसताना तिला कार्यालयात बोलविण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नव्हता. तरीही तिला कार्यालयात आणण्यास भाग पाडण्यात आले. वडील व आजोबा हे मूळ मालक असून दोघांनीही मृतक मुलीचे नोकरीकरिता नॉमिनेशन ( नामांकन ) दिले होते व संमती पत्रावर करार करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. यात वेकोलि कार्यालयाने नोकरी देण्यास टाळाटाळ करून दप्तर दिरंगाई करून कर्तव्यात कसूर केला आहे आणि वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडून मृतक मुलीला व कुटुंबाला मानसिक त्रास देऊन छळ केला तसे व आत्महत्येस प्रवृत्त केले.
या प्रकरणी वेकोलिचे संबंधित जिम्मेदार अधिकारी या कृतीस जबाबदार असल्यामुळे त्यांचे विरुद्ध तात्काळ कारवाई करावी व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड हा केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असल्यामुळे वेकोली बरोबरच केंद्र सरकार हे अशी दुहेरी जबाबदारी ( व्हायकॅरिअस लायबिलिटी ) असल्यामुळे आर्थिक मदत देण्यात पात्र आहे. म्हणुन या कुटुंबाला वेकोलि किंवा सरकारने दहा लाखाची आर्थिक मदत तात्काळ द्यावी, या कुटुंबात नॉमिनेशन देण्याकरिता अकरा वर्षाची मुलगीच मूळ मालकांची वारस म्हणून शिल्लक राहिली असून ती अज्ञान आहे. त्यामुळे ती सज्ञान झाल्यानंतर तिला नोकरी देण्याचे अभिवचन वेकोलिने देणे गरजेचे व बंधनकारक आहे.
या सर्व मागण्यांची तात्काळ परिपूर्ती करावी, अशी मागणी केंद्रीय कोळसा खाण मंत्री ना. पियुष गोयल, राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख आणि वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ( सीएमडी ) यांचेकडे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप, राजुरा तालुका शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस,कपिल ईद्दे, सिंधू बारसिंगे,पौर्णिमा निरांजने,चंद्रकला ढवस, तेजस्विनी कावळे,सिंधू लांडे, रमेश नळे,कवडू पोटे,नारायण गड्डमवार, दत्ता हिंगाणे, विनोद बारसिंगे, मारुती लोहे,संजय करमरकर,विठ्ठल पाल,बाबा कावळे,वासुदेव बूटले,नाना पोटे,अशोक बोनगिरवार,खुशाल अडवे,दत्तू ढोके, दादा येवले, धनराज लांडे, रमेश गौरकार, किशोर चौधरी,रमेश कुदीरपाल, महादेव ताजने, बंडू कोडापे, किशोर चौधरी यांनी केली आहे.