कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज, आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज
आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार
चंद्रपूर, ता. १७ : शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगर पालिका सज्ज झाली आहे. सध्या मूल रोड येथील वन अकादमीतील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित आहे. सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. उपचारासाठी वन अकादमी येथील तीन इमारतीत ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे २१९ रुग्ण भरती आहेत. यात १२५ पुरुष रुग्ण तर ९४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यात १४ वर्षाखालील आठ रुग्ण तर ६० वर्षांवरील १९ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील वर्षभरात एकूण ४६६९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यातील ३९११ रुग्ण उपचाराअंती बरे झालेत. सध्या  कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता चंद्रपूर महानगरपालिका सर्व प्रयत्न करीत आहे. कोरोना प्रतिबंधासह उपचारासाठी सैनिकी शाळा येथे ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत येथे २९० खाटा उपलब्ध होत्या. येथे वैद्यकीय अधिकारी आणि परीचारिकांसह कर्मचारी आरोग्य सेवेसाठी तैनात आहेत.
कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दूध डेअरी परिसरातील समाजकल्याण विभागाचे आदिवासी मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह येथे अनुक्रमे १८० आणि १२० खाटांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. याशिवाय २५० खाटांच्या सुविधेसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास महानगर पालिका सज्ज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू आहेत. नागरिकांना आपली तपासणी इंदिरानगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबुपेठ, भिवापूर,महानगर पालिकेच्या हेल्थ पोस्ट सेंटर आणि तुकूम येथील काईस्ट हॉस्पिटलमध्ये करता येईल.  
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.
—————————–
चंद्रपूर शहरात ३८ हजार ५९३ जणांनी घेतली लस
चंद्रपूर, ता. १७ :  अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या  कोव्हिड-१९ विषाणूची साखळी तोडणे हाच एकमेव पर्याय आजघडीला शिल्लक असून, या संकटाच्या काळात, कोरोनावरील लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. कोरोना लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात एकूण १४ लसीकरण केंद्र सुरु केले होते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे. यात कोविशिल्ड ३५ हजार १२० तर, कोव्हॅक्सीन ३ हजार ४७३ जणांना देण्यात आली.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील ५ हजार ५६३ योद्धांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी ५ हजार २८५ आरोग्य सेवकांना पहिला डोज, तर ३ हजार ३३५ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ३ हजार ५५३ कोरोना योद्धांचे नामांकन करण्यात आले होती. यातील ३ हजार २७३ जणांना पहिला डोज व १७२० जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. अशा प्रकारे आरोग्य सेवक व फ्रंट लाईन वर्कर मिळून ९ हजार ११६ नोंदणीकृत लाभार्थ्यांना पहिला व दुसरा असे १३ हजार ६१३ डोज देण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात  १ एप्रिल पासून ४५ वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक व ६० वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत १७ हजार ७१० ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोज तर ३८० नागरिकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. तसेच ६ हजार ८२५ व्याधीग्रस्त नागरिकांना पहिला डोज, तर ६५ जणांना दुसरा डोज देण्यात आला. म्हणजेच एकूण ३८ हजार ५९३ जणांनी पहिली आणि दुसरी लस घेतली आहे.
डोज  घेतल्यानंतर काही दिवसांनी  आपल्या शरीरामध्ये कोरोनाविरूद्ध लढा देण्यास आवश्यक शक्ती विकसित होईल. त्यामुळे,  लस घेतल्यानंतर लगेचच कोणताही निष्काळजीपणा न करता सतत मास्क वापरणे, हात धुणे व सहा फुटाचे अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.
———————-
आर.टी. पी.सी.आर. व अँटीजेन चाचणी केंद्र
चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सहा आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र तर चार अँटीजेन चाचणी केंद्राची सोय केली आहे. शहरात वन आकदमी, मूल रोड, काईस्ट हॉस्पिटल तुकुम,  शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वॉर्ड, भिवापूर वॉर्ड, सरदार पटेल प्राथमिक शाळा, रामनगर येथे आर.टी. पी.सी.आर. चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. याशिवाय अँटीजेन चाचणीची व्यवस्था शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरा नगर, सरदार पटेल प्राथमिक शाळा रामनगर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ४ बगड खिडकी, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. ५ बाबूपेठ येथे करण्यात आली आहे.
———–
महानगर पालिका क्षेत्र कोरोना अलर्ट
आजवरचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – १३,२३२
कोरोनावर मात – १०,९७१
मृत्यू – २१५
———————–
आजचे पॉझिटिव्ह – ३८७
एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण- २०४६
रुग्णालय भरती – ७५५
गृहविलगीकरण – १२९१

About Vishwbharat

Check Also

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द

काजू-बादाम से ज्यादा फायदेमंद है भूरे रंग का ये टाइगर नटस् कन्द   टेकचंद्र सनोडिया …

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम

जानिए त्वचा को गोरा बनाने के लिए जरुर खाईये काजू बादाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *