Breaking News

महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास.

Advertisements
महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास.
जगात कोरोनाने हाहाकार माजविला असतांना कोणताही उत्सव साजरा करू नये.असा निर्णय शहाण्या माणसांनी घेतला पाहिजे. भारतीय संविधान भारतीय नागरिकांना तसे वागण्याची विनंती करते.आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य व केंद्र सरकार जी काही आपत्कालीन उपाय योजना करतात ती दक्षता भारतीय संविधानात लिहून ठेवली आहे. त्यानुसार भारतीय नागरिकांनी वागले पाहिजे.आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब कुटुंब सुरक्षित तर परिसर सुरक्षित,परिसर सुरक्षित तर देश सुरक्षित.महाराष्ट्र व कामगार दिन साजरा करतांना या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यावी.पण इतिहास विसरू नये.तो खरा किती खोटा किती याची गुगल द्वारे तपासून पाहण्यास हरकत नसावी.
मुंबई सह गुजरात राज्य व्हावे ही गुजराती लोकांची मागणी होती.तर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही मराठी माणसांची मागणी होती.राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे राज्य भर प्रचंड जनांदोलन झाले होते.मराठी माणसात प्रचंड असंतोष खदखदत होता. त्या विरोधात गावागावात जनजागृती सभा होऊन सरकारचा निषेध करण्यात येत होता.त्या विरोधात २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होत.त्यामुळेच फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानका कडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे येत होता.पोलिसी ताकद वापरून मोर्चा उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. निरपराध मराठी माणसावर गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले.त्यामुळेच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.तेव्हा पासून १ मे हा महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.संयुक्त महाराष्ट्र जन आंदोलन प्रेरणादायी होते.त्यातून कोणी किती प्रेरणा घेतली हा संशोधनाचा विषय आहे.१ मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापन झाली तेव्हा पासून राज्य करणारे सत्ताधारी मराठा समाजाचे नेते आहेत. शासन यंत्रणेवर त्यांच्या समाजाचा कायमस्वरूपी दबाव आहे हे कोणीच नाकारू शकत नाही.तरी ते आज त्यांच्या समाजाला आरक्षण मागत आहेत. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि पुरोगामी विचारांचा फुले,शाहू, आंबेडकरांचा म्हणून ओळखला जातो.ती फडणवीस आणि सूर्याजी पिसाळाची वंशवळ कुठे तरी पुसून काढण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.असो…..
भारताचा खरा कामगार दिन हा १० जून १८९० असायल पाहिजे कारण या दिवशी जगातील कामगारांना हक्काची रविवार सुट्टी सुरु झाली.रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वात कामगारांनी सहा वर्ष संघर्ष करून ती मिळाली होती.तरी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा १ मे १९१७ मानल्या जातो. कारण जात महत्वाची की कार्य?.इतिहास लिहणारे तेच प्रसिद्ध करणारे तेच.आणि अंमलबजावणी करून घेणारे ही तेच.म्हणूनच महाराष्ट्राचा व कामगार दिनाचा खरा इतिहास तपासून वाचला पाहिजे.
 क्रांतीपूर्व काळात रशियात झार घराण्याची सत्ता होती. २४ ऑक्टोबर १९१७ ला रशियात झालेल्या राजकीय उलथापालथीस रशियन क्रांती म्हटले जाते. यामुळे झारची निरंकुश सत्ता लयाला गेली.ऑक्टोबरमधील दुसऱ्या क्रांतीत हंगामी सरकारची सत्ता बोल्शेव्हिक (साम्यवादी) सरकारच्या हाती गेली.बोल्शॅव्हिक नेता व्लादिमीर लेनिन याने केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केले.रशियन राज्यक्रांती ही पहिली साम्यवादी क्रांती होती. जगभरातील कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरली. आर्थिक नियोजनाच्या मार्गाने विकास साधण्याची संकल्पना ही या क्रांतीने जगाला दिलेली देणगी आहे. इ.स. १९१७ च्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोग्राड येथे कामगारांनी संप पुकारला. ही रशियन राज्यक्रांतीची नांदी ठरली. त्यानंतर राजधानीतील सैनिकांनीही कामगारांना पाठिंबा दिला. हे या राज्यक्रांतीचे पहिले पर्व होते. स्वित्झर्लंडमध्ये अज्ञातवासात असलेला बोल्शेव्हिक नेता लेनिन इ.स. १९१७ च्या एप्रिलमध्ये रशियात परतला, तेंव्हा या राज्यक्रांतीचे दुसरे पर्व सुरु झाले.
रशियातील १९१७ च्या कामगार क्रांतीनंतर मे दिनाचा जगभर प्रसार झाला. मात्र कामगार दिनाची सुरुवात अमेरिकेत झाली. शिकागो या शहरात अमेरिकेतील कामगार चळवळ तीव्र होण्याचा तो काळ होता. म्हणजे १८८० ते १८९० या दशकाचा (त्याच काळात रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडेंनी मुंबईतील कामगारांना संघटित केले होते याचा सोयीस्कर पणे विसर केला जातो ). १८८६ मध्ये शिकागोच्या कामगारांनी एक प्रचंड सभा आयोजित केली होती. मागणी होती तशी साधी – कारखान्यातील कामाचे तास आठ असावेत! त्या काळी कामगारांना (भारतात, इंग्लंडमध्ये वा अमेरिकेत) १२ ते १६ तास काम करावे लागत असे. त्या सभेत एक बॉम्बस्फोट झाला आणि पोलिसांनी ते निमित्त करून कामगारांवर बेबंद गोळीबार केला. त्या गोळीबारात अनेक कामगार बळी पडले. त्या बातमीने फक्त अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण युरोपातही असंतोष पसरला. १८८९ या वर्षी फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी होती. त्या शताब्दीचा मुहूर्त साधून अमेरिकेतील कामगारांनी १ मे रोजी प्रचंड सभा घेतली. त्या सभेत असा निर्णय झाला की शिकागोमध्ये बळी पडलेल्या कामगारांच्या स्मरणात जगभर ‘मे दिन’ हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जावा. ‘आयटक’ या भारतात स्थापन झालेल्या देशव्यापी कामगार संघटनेने १ मे या दिवशी ‘जगातील कामगारांनो एक व्हा’ या कार्ल मार्क्स यांच्या सूत्रानुसार भारतातील कामगारांना एकत्र आणायला सुरुवात केली. तेव्हापासून भारतात १ मे हा कामगारांचा कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
 भारतीय कामगारांना आज ज्या सुविधा प्राप्त झाल्या आहेत आणि जे वेतन त्यांना मिळत आहे, त्यामागे या कामगार चळवळीचे योगदान आहे. याचा अर्थ असा नव्हे की सर्व कामगारांना व असंघटीत कष्टकरी कामगारांना आज चांगले वेतन आणि योग्य न्याय मिळते आहे. देशात असंघटित कामगारांचा प्रचंड वर्ग आहे, जो अजून सर्वार्थाने उपेक्षित आहे. किंबहुना आता तर असेही म्हणता येईल की संघटित कामगार वर्गाने (मग ते कारखान्यातील कुशल कामगार असोत वा बँकांमधील कर्मचारी, प्राध्यापक वर्ग असो वा पब्लिक सेक्टरमधील कामगार-कर्मचारी) आता असंघटित कामगार वर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या पदरात पडलेल्या सुविधा, वेतनवाढ, बोनस, पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड कोट्यवधी असंघटित कामगारांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यांच्यासाठी संघटित कामगार चळवळीने फारशी आंदोलनेही केलेली नाहीत. त्यामुळे कामगार वर्गातही आता दोन थर निर्माण  झाले आहेत. जातीव्यवस्था विचारांचे समर्थक संघटना,युनियन कम्युनिस्ट मार्क्सवादी,गांधीवादी,मनुवादी गोळवलकर वादी,समाजवादी पुरोगामी कामगारांना कंपनीच्या आत कामगार समजतात आणि गेटच्या बाहेर निघाल्यावर त्यांची जात धर्म शोधतात.त्यामुळेच कुठे ही कंपनीत कार्यालयात कामगार कर्मचारी अधिकारी आत वेगळा आणि बाहेर वेगळा असतो.
सधन कामगार-कर्मचारी आणि ज्याला किमान वेतनही मिळत नाही असा एक कामगार वर्ग. कामगार वर्गातच निर्माण झालेल्या या विषमतेबद्दल ट्रेड युनियन संघटनांमध्ये वैचारिक व संघटनात्मक मांडणी झालेली नाही. याची जी कारणे आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कामगार संघटनांमध्ये एकजूट व एकवाक्यता नाही. कामगार संघटना या काही ठिकाणी तर माफियांच्या ताब्यात गेल्या आहेत. कामगार चळवळीला काही ठिकाणी गुन्हेगारी रूप आले आहे. कामगार पुढाऱ्यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. कामगार संघटनांमधील स्पर्धांमुळे एकूणच ट्रेड युनियन चळवळ आज खऱ्या अर्थाने परिणामशून्य झाली आहे. ज्या कम्युनिस्ट पक्षाच्या व विचाराच्या पुढाकाराने कामगार चळवळ संघटित झाली आणि मे दिनाला तेज प्राप्त झाले, त्या पक्षात एक नव्हे तर अनेक फुटी पडल्या. काही वेळा त्या फुटी प्रादेशिक, भाषिक भेदही चळवळीत आणू लागल्या. एकत्रितपणे मे दिन साजरा होत असे तोही प्रत्येक कामगार संघटना स्वतंत्रपणे साजरी करू लागली आणि आता तर मे दिन हाच विस्मरणात जाऊ लागला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे मुंबईतील स्मारक कामगार-शेतकऱ्यांच्या संयुक्त मशालीतून प्रगट होते. कारण त्या चळवळीवर मुख्य प्रभाव होता तोच कम्युनिस्ट-समाजवादी विचाराचा. तो मनुवादी नेतृत्वा समोर हिंदुत्वादी कामगारांनी गुढगे टेकून संपला आहे. १० जून हाच भारतीय कामगारांच्या खरा कामगार दिन आहे. महाराष्ट्र व कामगार दिनाचा इतिहास प्रत्येक मराठी माणसांनी व कामगारांनी वाचलाच पाहिजे.इतिहास वाचा आणि इतिहास घडवा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडूप मुंबई.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *