विश्व भारत ऑनलाईन :
पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशाच योजनेचा विचार सुरु असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलले होते. मात्र,अजून निर्णय झालेला नसताना प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी माहिती दिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे प्रसिद्धीलोलुप मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली.
नवे सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे जनतेच्या सरकारकडून अपेक्षा वाढू लागल्या असल्या तरी त्याची पूर्तता करताना सरकारची दमछाक होत आहे. यातून सरकारची प्रतिमा खराब होऊ शकते.त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी याबाबत गंभीर दखल घेतली.
केंद्राच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने प्रमाणेच राज्यातही नवीन सन्मान योजना राबवावी किंवा केंद्राच्या योजनेत राज्याचा काही वाटा समाविष्ट करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये विचारमंथन सुरू आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही ‘गोपनीय बातमी’ प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.
अजून कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली, अशी थेट विचारणाच फडणवीस यांनी सत्तार यांना केली. मुख्यमंत्र्यांनीही सत्तार यांना खडसावले.
सत्तार यांची सारवासारव
आपण निर्णय झाल्याचे म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचे सांगितले, अशी सारवासारव सत्तार यांनी केली. मात्र, त्याने कोणाचेही समाधान झाले नाही. कोणताही धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. नवी योजना किंवा निर्णय घेताना त्याबाबत मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. केवळ विचार सुरू असताना घोषणा केल्यास त्या विषयाचे, निर्णयाचे महत्त्व निघून जाते. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका, असा इशाराच फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीमुळे सत्तार यांची कोंडी झाली.