चंद्रपूर : सावली तालुक्यातील केरोडा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापू राऊत (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. केरोडा येथील सुखदेव राऊत हे तीस वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोसायटीच्या वतीने केरोडा गावातीलच तलावात मासेमारी करण्यात आली.
संस्थेतंर्गत असलेल्या काही गावातील मत्स्य व्यवसायिक केरोडा गावात मासेमारीकरिता एकत्रित जमले होते. यामध्ये सुखदेव राऊत हे देखील उपस्थीत होते. राऊत हे मासेमारीकरिता जाळे घेऊन गाव तलावातील पाण्यात शिरले. परंतु त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले. पोलिसांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविला.