पैठण गोदावरी नदीतून वाळू तस्करी करताना जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. महसूल विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे.
प्रकरण काय?
पैठण गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी करताना महसूल विभागाच्या औरंगाबाद पथकाने 12 जानेवारी रोजी रजनीकांत हिरालाल कटारिया (रा. मानेपेठ मुंगी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांच्या नावावर असलेले ट्रॅक्टर यारी सह वाळू तस्करी करताना जप्त केले होते. सदरील ट्रॅक्टर व वाळू उपसा करणारी यारी मशीन पैठण मंडळ अधिकारी गणेश सोनवणे यांनी पंचनामा करून सदरील ट्रॅक्टर मुद्देमाल तहसील कार्यालयात जमा केला. जप्त ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या परिसरातून रात्रीच्या वेळेस अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार घडल्याची माहिती रात्रपाळीच्या ड्युटीवर असलेले कोतवाल शिवाजी गायकवाड यांनी दिली. प्रभारी तहसीलदार शंकर लाड यांच्या आदेशाने ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
तक्रार पैठण तलाठी दिलीप तुकाराम बाविस्कर यांनी बुधवारी रात्री उशिरा पैठण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किशोर पवार यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध एकूण 1 लाख 60 हजार रुपयाचे ट्रॅक्टर व यारी मशीन चोरून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.