भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सारं काही सुरळीत सुरु आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. या दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.
या तक्रारीत असं दिसून येत आहे की, डीपीडीसीचा 100 टक्के निधी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या मतदारसंघात वळवून घेतला आहे. त्यामुळं आता भाजप आमदार आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तानाजी सावंत यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.
…बंडखोरी
निधी मिळत नसल्याचं प्रमुख कारण सांगून बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदारांनी बंडखोरी केली होती. मात्र आता जेंव्हा तेच आमदार मंत्री झाले तर सगळा निधी आपल्याच मतदारसंघात वळवून घेत असल्याचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळं भाजप आमदार आणि बाळासाहेंबाची शिवसेना पक्षाचे मंत्री यांच्यात कुठंतरी संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या तानाजी सावंत आहेत. पालकाने कुटुंबातील सर्वांना समसमान वाटा देणं गरजेचं असतं. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात त्याच्या उलट प्रकार पाहायला मिळत आहे.