नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती.
रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी गाड्या मेन लाईनवर उभ्या आहेत. प्रवाशांना या घटनेमुळे भर उन्हात गरमीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. गाडीचं चाक नेमकं कशामुळे जाम झाले,याबाबत अजून माहिती मिळू शकलेले नाही.