नागपूर आणि विदर्भातील उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रात रेलचेल वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (नागपूर) प्रवासीसंख्या गेल्या वर्षभरात सुमारे पावणे दोन लाखांनी वाढली आहे. प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असून, शहराच्या आर्थिक आणि पायाभूत विकासाचे हे द्योतक मानले जात आहे.
शासकीय आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण २६.८५ लाख प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून प्रवास केला. २०२४ या वर्षांत याच कालावधीत ही संख्या २५.१२ लाख इतकी होती. म्हणजेच मागील वर्षांत सुमारे १.७३ लाख प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे.
२०२३ मध्ये नागपूर विमानतळावरून २६.४७ लाख प्रवाशांची ये-जा केली होती. मात्र २०२४ मध्ये प्रवासीसंख्येत सुमारे १.३५ लाखांची घट झाली होती. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा एकदा प्रवासीसंख्या वाढीच्या दिशेने मार्गक्रमन करत असल्याचे चित्र आहे. सध्या दररोज सरासरी ९ हजारांहून अधिक प्रवासी विमानतळावर ये-जा करीत असून, येथून सुमारे ६० उड्डाणे (आवागमन) आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांचे म्हणण्यानुसार व्यावसायिक वाढ, पर्यटन, तसेच राजकीय घडामोडींमुळे प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेले नागपूरचे भौगोलिक स्थान विमानवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे.
सध्या नागपूरहून दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, इंदूर, गोवा आणि किशनगड या प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच शारजाह आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू या मार्गांवर सर्वाधिक उड्डाणे होत आहेत. महिन्यातील आकडेवारीत वर्षभर प्रवासीसंख्येत चढ-उतार दिसून आहे. नोव्हेंबर महिन्यात २.८ लाखांहून अधिक प्रवाशांची नोंद झाली आहे. आगामी काळात नागपूर विमानतळावर प्रवासीसंख्येत वाढ होईल, असे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
“प्रवाशांचा वाढता आलेख आहे. सातत्याने त्यात वाढ होत असून, तो एक सकारात्मक निर्देशक मानला जातो. आर्थिक हालचालींमध्ये वाढ होत असल्याचे संकेत आहेत.” -आबिद रुही, वरिष्ठ संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर
विश्वभारत News Website