छत्रपती संभाजीनगर आणि जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून महायुतीमध्ये शिवसेनेला (शिंदे) उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्या पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केलेल्या टीकेत गैर कांही नाही. सत्तार यांनी यासंदर्भात केलेले वक्तव्य भाजपच्या नेत्यांना कटू वाटत असेल परंतु ते सत्य आहे, अशी प्रतिक्रिया जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी व्यक्त केली आहे
ते म्हणाले, ही जागा पूर्वी त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेकडे होती. शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा मिळून सात विधान परिषद सदस्य तसेच एक लोकसभा सदस्य आहे. परंतु यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले वर्चस्व वाढविण्यासाठी भाजपने ही जागा आपल्याकडे घेतली. कोणत्याही पक्षात असले तरी अब्दूल सत्तार यांचे सिल्लोड भागातील वर्चस्व भाजपला नेहमीच खटकत आलेले आहे. त्यामुळे भाजपने फुलंब्रीच्या सुहास शिरसाठ यांना मुद्दाम उमेदवारी दिली आहे. फुलंब्री आणि सिल्लोड हे लगतचे तालुके आहेत.पुढील काळात शिरसाठ निवडून आल्यावर भाजप तेथे सत्तार यांच्या विरोधात जनाधार संघटीत करण्याचा प्रयत्न करील याविषयी आपल्या मनात शंका नाही.
छत्रपती संभाजीनगरचे महापौर, स्थानिक स्वराज्य संस्था मधील आमदार आपल्या पक्षाचा केल्यावर आता भाजपची नजर मराठवाडा पदवीधर मतदार संघातील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे( अजित पवार ) आमदार सतीश चव्हाण यांच्या जागेवर असणार आहे असे वाटते. जालना महानगरपालिका निवडणुकीत युती करण्याच्या निमित्ताने भाजपने आपल्याच मित्रपक्षांची फसवणूक कशी केली याचे उदाहरण समोर आहे. या निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर भाजपने काँग्रेसच्या स्थानिक माजी आमदारांसह त्या पक्षाच्या कांही माजी नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. नगरपरिषदेचे रुपांतर महानगरपालिकेत होण्यापूर्वी भाजपला कधीही आपला नगराध्यक्ष करता आला नव्हता. काँग्रेसमधील अनेकांना प्रवेश देण्यामागे भाजपचा उद्देश स्वतःचा महापौर करण्यासोबत शिवसेनेला (शिंदे) सत्तेपासून दूर ठेवणे हाही होता. महापौरपद भाजपकडे जरूर आले परंतु आरक्षणाची सोडतच अशी निघाली की मूळ भाजपमधील कुणालाही त्या पदासाठी उभे राहता आहे नाही.परिस्थितीच अशी निर्माण झाली की काँग्रेसमधून आलेल्यांकडे महापौरपद देण्याशिवाय मूळ भाजपच्या नेत्यांना पर्याय राहिला नाही ! अगदी स्वीकृत नगरसेवक निवडीतही भाजपने कॉग्रेस नगरसेवक फोडण्याचे डावपेच टाकले. अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्याकडे वळवून भाजपने त्यांच्याच एका पराभूत उमेदवाराच्या पारड्यात काँग्रेसच्या वाट्याचे हे पद टाकले. भाजला केवळ महाविकास आघाडीतील आपले मित्र पक्षही संपवायचे आहेत. तसे नसते तर जालना महानगरपालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपात अंतिम क्षणापर्यंत युतीचा घोळ घालून भाजप स्वतंत्र लढला नसता.त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या संदर्भात केलेले वक्तव्य महायुतीमधील शिस्तीत बसते की नाही हे मला सांगता येणार नाही,परंतु खरे बोलण्याचे धाडस मात्र त्यांनी केले आहे, असेही दळे म्हणाले.
विश्वभारत News Website