मागील 8 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील बंधपत्रित – परिचारिकांना आरोग्य सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला.
बंधपत्रित परिचारिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. याबाबत परिचारिकांच्या संघटनेने बऱ्याच वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लढा दिला होता. आज त्यांच्या मागण्यावर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला.
शासकीय महाविद्यालयामधून उत्तीर्ण झालेल्या परिचारिका यांना शिक्षणानंतर शासन सेवा करणे बंधनकारक होते. आता सन २०१९ पर्यंत कार्यरत असलेल्या या सर्व बंधपत्रित परिचारिकांना शासन सेवेत कायम करण्यात आलेले आहे.
सन २०१९ पर्यंतच्या सर्व बंधपत्रित परिचारिकांचा सेवा तपशील तपासून आता शासकीय सेवेत कायम करण्यासाठी एका विशेष परीक्षेचे आयोजन आरोग्य विभागामार्फत केले जाणार आहे,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे सुमारे ८०० पेक्षा जास्त बंधपत्रित परिचारिकांचा सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या सर्व परिचारिकांनी मंत्रालयात आनंदाचा जल्लोष केला व असा संवेदनशील निर्णय घेतल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार केला. कोरोना काळात बोन्डेड नर्स यांनी रुग्णांची सेवा केली. त्यांना कायम करने आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या बैठकीसाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे अभियान संचालक तथा आयुक्त धीरज कुमार, आरोग्य संचालक नितीन अंबाडेकर, स्वप्नील लाळे आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.