यवतमाळ शहरातील रंभाजीनगरात असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्याचा किटा (कापरा) येथील डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. कार्तिक पुंडलिक मेश्राम (१७, रा. दहेगाव, ता. राळेगाव), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता बारावीत अमोलकचंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. कार्तिकच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, आदिवासी विभागाच्या दुर्लक्षित धोरणावर ताशेरे ओढले.
कार्तिक इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यापासून आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात राहत होता. रविवारी कार्तिक वसतिगृहातील विद्यार्थी व बाहेरच्या विद्यार्थ्यांसह किटा कापरा परिसरात गेला होता. दरम्यान त्याचा किटा (कापरा) येथील डोहात आज त्याचा मृतदेह आढळून आला. आपल्या मुलाचा मृत्यू संशयास्पद असून, या घटनेस जबाबदार असलेल्या सोबतच्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी पुंडलिक बाजीराव मेश्राम (रा. दहेगाव) यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
या घटनेमुळे आदिवासी विभागाच्या वतीने चालविण्यात येणार्या वसतिगृहातील दुर्लक्षीत कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत कावरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.