वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक ऋतू राहिला नसून बाराही महिने अधूनमधून पाऊस कोसळत असतो. आताही थंडी परतत आहे असे वाटत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवू लागली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दिवसा उन्हाचा कडाका तर रात्री थंडीची चाहूल असे वातावरण आहे.
राज्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, गुरुवार रात्रीपासून पुन्हा गार वारे आणि थंडी जाणवू लागली आहे. सध्या कमाल व किमान तापमानात वाढ असली तरी रात्री व पहाटे मात्र थंडी आहे. शनिवारपासून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात देखील सर्वच जिल्ह्यात आजपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातील सर्वच अकराही जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून तर बुधवारपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात अलीकडच्या काही वर्षात थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे. यावर्षी देखिल हिवाळा असा फारसा जाणवला नाही. अधूनमधून थंडीची चाहूल होती, पण हिवाळा खरंच होता का, अशी परिस्थिती यंदा विदर्भात होती. आठ दिवसांपूर्वी विदर्भातील दोन-तीन जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळला. आता उन्हाचे चटके जाणवत असतानाच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गुरुवारपासून मात्र रात्री आणि पहाटेच्या सुमारास गार वाऱ्यांमुळे थंडीदेखील जाणवत आहे. तर शनिवारपासून पावसाची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणात मात्र पावसाची शक्यता नसून थंडी कायम राहील.