शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला ईस्ट, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव या मतदारसंघांतील नावे वगळण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
महाराष्ट्रातील मतदारांची नावे वगळून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील मतदारांची नावे त्यामध्ये टाकून दहा हजार नावे त्यामध्ये जोडली जात आहेत. हे भाजपचे कारस्थान असून त्यात राज्यातील काही अधिकारी सहभागी असल्याचा आरोप, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज करण्यात आला. महाविकास आघाडीच्या ट्रायडेंट हॉटेल येथील बैठकीदरम्यान शिवसेना नेते (ठाकरे) संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्तरीत्या पत्रकारांशी बोलताना मतदारसंघातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा केला.
देशातील निवडणुका निष्पक्ष घेण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. मात्र, त्या अधिकाराचे उल्लंघन सुरू आहे. निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ शकत नाही, आपण सत्ता गमावत आहोत, या भीतीने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी हे मोठे कारस्थान लोकशाही विरोधात रचले. काही मतदारसंघ त्यांनी ठरवलेले आहेत. त्यासाठी विशेष अॅपची निर्मिती करून प्रत्येक मतदारसंघात किमान १० हजार मते त्यामधून काढून टाकायची आणि तेवढी मते त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील टाकण्याचे कारस्थान समोर आलेलं आहे. १५० मतदारसंघांत हा घोळ सुरू आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजप पदाधिकारी या कामाला लागले आहेत. याचे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
नाना पटोले यांनीही महाराष्ट्रातील काही मतदारांची नावे कट करून छत्तीसगड, मध्य प्रदेशसह बाहेरच्या राज्यातील काही मतदारांची नावे त्यामध्ये टाकून १०-१० हजार नावे जोडली जात आहेत. त्यामध्ये राज्यातील काही अधिकारी सहभागी झाले आहेत. आम्ही याची माहिती निवडणूक आयोगाला दिली. भाजप महाराष्ट्राच्या लोकांचा गळा घोटण्याचे काम करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सूचित करत आहोत की हे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू झालं आहे, हे थांबले पाहिजे, असे नाना पटोले म्हणाले.