वाहन चालविण्याचे कौशल्य असणे अत्यंत महत्वाचे आहे. वाहन चालविता येणारे व्यक्ती आत्मनिर्भर मानले जातात. मात्र, आता वाहन चालविण्याचे हे कौशल्य तुम्हाला भरघोस पगाराची नोकरीही देऊ शकतात.मुंबई उच्च न्यायालयाने स्टाफ कार वाहनचालक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना ९ मे २०२५ पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीद्वारे न्यायालयाच्या मुंबईतील प्रधान आसनस्थानी एकूण अकरा पदे भरण्यात येणार आहेत.
सध्या तीन पदे रिक्त असून पुढील वर्षात आठ पदे रिक्त होणार आहे. सर्व अकरा पदांसाठी आताच जाहिरात काढण्यात आली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार ९२ हजार ३०० पर्यंतचा मासिक पगार मिळणार आहे. सोबतच सरकारी नोकरीशी संबंधित सर्व सुविधा व लाभही लागू होतील.
दहावी उत्तीर्णची अट
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे वैध हलक्या मोटार वाहनांचा परवाना असावा. उमेदवाराने किमान तीन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभव घेतलेला असावा. याशिवाय वाहनांची दुरुस्ती व देखभाल तसेच मुंबई शहरातील भूगोलाची माहिती असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवाराचे वय सामान्य प्रवर्गासाठी २१ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. मराठी आणि हिंदी भाषांचे वाचन, लेखन आणि संभाषण येणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत ठराविक फॉरमॅटमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ५०० असून, ते ‘एसबीआय कलेक्ट’च्या माध्यमातून ऑनलाईन भरावे लागेल. अर्ज करताना दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. उमेदवारांची निवड प्रथम शॉर्टलिस्टिंग, त्यानंतर वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी आणि अंतिम मुलाखतीच्या आधारे होणार आहे. वाहन चालविण्याची चाचणी आणि मुलाखत यामध्ये उमेदवाराचा अनुभव, वाहनांची देखभाल याविषयीचं ज्ञान आणि मुंबईतील मार्गांची माहिती तपासली जाणार आहे. अधिकृत माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले.