Breaking News

काँग्रेस एकवटली : शिस्तबद्ध भाजप पोखरू लागली!

दिल्ली ते गल्लीपर्यंतची सर्वच सत्तास्थाने काबीज करायला निघालेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याकडे असलेली धनशक्ती एकीकडे आणि यापैकी काहीच हाती नसलेला काँग्रेस पक्ष दुसरीकडे. मात्र या दोन्ही पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीचा मुद्दा वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीमुळे पक्षात असंतोष उफाळून आला आहे तर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहणात कधी नव्हे ती नेत्यांची एकजुट दिसून आली. ही एकी किती दिवस कायम राहील हे काळ ठरवेल पण आज तरी गटबाजीसाठी प्रसिद्ध काँग्रेसमध्ये एकजूट तर शिस्तबद्ध भाजपला गटबाजीने पोखरल्याचे चित्र आहे.

 

काँग्रेसला गटबाजी नवीन नाही, या पक्षाच्या जीवंतपणाचे ते लक्षण मानले जाते. नागपूर जिल्द्यातील काँग्रेस तर यासाठीच प्रसिद्द आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा नेत्यांच्या गटबाजीमुळेच भाजपच्या हाती गेला. भाजपचे तसे नाही, येथेही गटबाजी आहे. पण ती छुपी. ‘पक्षशिस्त’ या नावाखाली ती दडपून टाकली जाते.उघडपणे कोणी बोलत नाही, मात्र सध्या नागपूर जिल्ह्यात चित्र उलटे दिसून येत आहे. जिल्हा कार्यकारिणीवरून भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध उपरे हा वाद चव्ह्ट्यावर आला आहे तर ऐरवी कायम परस्परांचे पाय ओढणारे जिल्ह्यातील काँग्रेस नेत जिल्हाध्यक्षाच्या पदग्रहणाला एकत्र आले होते.

 

केंद्र व राज्यात सत्तेत असल्याने म्हणा किंवा सत्तेची फळे गोड असल्याची जाणीव झाल्याने म्हणा पण नागपूर जिल्हा भाजपची वाटचाल काँग्रेसच्या दिशेने होऊ लागली आहे. तसेच सत्ता गेल्यामुळे हताश झालेल्या काँग्रेस नेत्यांना राजकारणात टिकून राहण्यासाठी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकले असावे, असे दिसते.

 

भाजप नेतृत्वाने सर्वच पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारल्याने तेथे गर्दी वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी कार्यकारिणीत सर्वांना समाविष्ठ करून घेता यावे म्हणून जिल्ह्याची दोन भागात विभागणी केली.सहा विधानसभा मतदारसंघाच्या नागपूर जिल्ह्यासाठी प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक या प्रमाणे दोन अध्यक्ष नियुक्त केले. एक पक्षाचा निष्ठावंत (आनंदराव राऊत) तर दुसरा (मनोहर कुंभारे) काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला. राऊत यांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर केली पण कुंभारेना ती अद्याप करता आली नाही. राऊत यांच्या कार्यक्षेत्रातील उमरेड मतदारसंघात कार्यकारिणीबाबत आक्षेप तेथील माजी आमदारांनी घेतले तर कुंभारे यांची कार्यशैलीवर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. एकूणच भाजपमध्येही बेशिस्त मुळ धरू लागल्याची ही चाहुल मानली जात आहे.

 

दुसरीकडे कुठल्याही नियुक्तीवरून वादळ उठणाऱ्या काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणाऱ्या जाहीर प्रतिक्रिया पक्षातून उमटल्या नाहीत.काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांची युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली, पण राऊत समर्थकांनी प्रतिक्रिया दिली नाही. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद होतील, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतील ,अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही, उपट पदग्रहणाला झाडून सर्व नेते एका व्यासपीठावर आले. विशेष म्हणजे जी काँग्रेस गटबाजीसाठी प्रसिद्ध आहे तेथे एकोप्याचे दर्शन आणि जी भाजप शिस्तीचे ढोल वाजवत असते त्यात वाद असे वेगळे चित्र सध्या नागपूरच्या राजकीय पटलावर दिसून येत आहे.

About विश्व भारत

Check Also

PM मोदी को गाली देने वाला मामला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बड़ा बयान

PM मोदी को गाली देने वाले मामले पर एकनाथ शिंदे का बड़ा बयान टेकचंद्र सनोडिया …

महसूल मंत्री बावनकुळेंच्या कामठी-मौदात मतचोरी : राहुल गांधींच्या आरोपानंतर ३ सप्टेंबरला थेट…

ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरीचा आरोप भाजप आणि निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *