स्वातंत्र्य दिनाच्या वेळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील भगतसिंग चौक येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) इमारत व दळणवळण विभागाच्या (B&C) विश्राम गृह येथील राष्ट्रध्वज फडकविताना गंभीर नियमभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच नागपुरातील महाल येथील दुय्यम निबंधकाकडून राष्ट्रध्वज फडकविताना नियमभंग झाल्याचे समजते. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भारतीय राष्ट्रध्वज संहिता व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार, राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या सर्वोच्च भागात शीर्ष स्थानी, संपूर्ण मान-सन्मान राखून फडकवणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित शासकीय विश्राम गृहात 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज सर्वोच्च टोकावर न फडकविता, खालच्या पातळीवर लावण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचे स्पष्ट चित्र नागरिकांच्या नजरेस पडले.
कायद्याचे उल्लंघन
घटना केवळ नियमभंग नसून ‘भारतीय राष्ट्रध्वज संहिता’, ‘राष्ट्रध्वजाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’ तसेच भारतीय दंड संहिता कलम 2(व), कलम 3 आणि संबंधित शासकीय परिपत्रकांचे उल्लंघन करणारी आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार शासकीय जागेवर आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडला असून, वरिष्ठ अधिकारी व जबाबदार कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रीय सन्मानाला तडा गेला आहे.
जनतेच्या ठाम मागण्या
प्रकरणी सुज्ञ नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली असून 15 ऑगस्ट रोजीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीत पुढील कारवाईच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
या घटनेची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी.
राष्ट्रध्वज अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत गुन्हे दाखल करावे.