Breaking News

“घायल हूं, इसलिए घातक हूं”: ‘धुरंधर’ची ३०० कोटींची दणदणीत कमाई

Advertisements

सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच बॉलिवूडचा ‘धुरंधर’ हा चित्रपट रविवारी (१४ डिसेंबर) जागतिक बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटींचा टप्पा पार करत चर्चेचा विषय ठरला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरील या गुप्तहेर थ्रिलरला दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयासाठी, विशेषतः रणवीर सिंगच्या दमदार भूमिकेसाठी भरपूर दाद मिळत आहे. काही समीक्षकांनी चित्रपटातील उघड हिंसा आणि राजकीय दृष्टिकोनावर टीका केलेली असली, तरीही प्रेक्षकांचा प्रतिसाद मात्र त्याहून वेगळा दिसतो. विशेषत: रणवीर सिंगच्या स्टारपॉवरविषयी बोलायचे झाले, तर या यशामागे एक ठरलेला ‘विजयी फॉर्म्युला’ काम करत असल्याचे स्पष्ट जाणवते.

Advertisements

टिझर्स प्रदर्शित झाल्यापासूनच रणवीरचा नव्या रूपातील लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘लुटेरा’मधील त्याची नाजूक, शांत शैली किंवा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’तील त्याचे रंगेल, चैतन्यमयी व्यक्तिमत्त्व या दोन्हींपासून पूर्णपणे भिन्न असा हा अवतार. ‘धुरंधर’मध्ये तो रक्ताळलेला, गंभीर आणि क्रूर भासतो; ओठांवर सिगारेट, रानटीपणे विस्कटलेले केस आणि लाल कपड्याने घट्ट बांधलेल्या मुठी या सगळ्यामुळे पडद्यावर त्याचे अस्तित्त्व अधिकच प्रभावी जाणवते.

Advertisements

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची ३०० कोटींची दणदणीत कमाई

‘जयेशभाई जोरदार’, ‘८३’ आणि ‘सर्कस’सारखे सलग अपेक्षाभंग करणारे चित्रपट दिल्यानंतर ‘धुरंधर’हा रणवीर सिंहसाठी पुनरागमनाचा सिनेमा मानला जात आहे आणि हे पुनरागमन अॅक्शन चित्रपटातून होत आहे, हा काही योगायोग नाही. बॉलिवूडच्या इतिहासात याचे स्पष्ट संकेत सापडतात. इथे stakes नेहमीच उंच असतात; एखादा स्टार अपयशाच्या मालिकेत सापडला असेल किंवा विश्रांतीनंतर पुन्हा पडद्यावर परतत असेल, तर तो सहसा प्रेमकथा किंवा हलक्या-फुलक्या विनोदी चित्रपटाची निवड करत नाही. अशा वेळी तो परत येतो तो थेट राग, जोर आणि झुंजारपणा घेऊन लढवय्याच्या मूडमध्ये.

अॅक्शन: बॉलिवूडचे सर्वात भरोसेमंद CPR

रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ लूक हा हिंसक करिष्म्याचा विलक्षण संगम आहे. ‘अ‍ॅनिमल’ची क्रूर तीव्रता, ‘पठाण’चा झकास आत्मविश्वास आणि ‘वॉन्टेड’ची छातीठोक मर्दानगी हे तिन्ही रंग त्याच्या रूपात एकत्र मिसळलेले दिसतात. ही उदाहरणे फक्त तुलना नाहीत; कारण हे तिन्ही चित्रपट त्यांच्या स्टार्ससाठी करिअरला नवी दिशा देणारे ठरले होते. ‘वॉन्टेड’च्या (२००९) आधी सलमान खान सलग अपयशांना सामोरा जात होता. ‘युवराश’, ‘मॅरिगोल्ड’, ‘गॉड तुसी ग्रेट हो’ या चित्रपटांनी खानच्या स्टारडमला खड्ड्यात टाकले होते. पण ‘वॉन्टेड’ नंतर त्याने पुन्हा एकदा जनसामान्यांना थेट भिडणाऱ्या मसालेदार अॅक्शनकडे वळण घेतले आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतरची सलग हिट्सची मालिका ‘दबंग’, ‘रेडी’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’ यांनी त्याला २०१० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक दबदबा असलेल्या मास-अॅक्शन सुपरस्टारच्या पदावर पुन्हा बसवले.

धुरंधरमधील एक दृश्य

हीच पटकथा दशकभरानंतर शाहरुख खानसाठीही तंतोतंत कामी आली. ‘झिरो’च्या (२०१८) व्यापारी आणि समीक्षात्मक अपयशानंतर जवळपास चार वर्षांच्या विश्रांतीनंतर ‘किंग ऑफ रोमॅन्स’ पुन्हा मोठ्या पडद्यावर परतला. पण यावेळी तो प्रेमकथेत नव्हे, तर दमदार अॅक्शनने भरलेल्या ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’मधून. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडीत काढले आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी SRK चे रूप पुन्हा घडवले. नव्या पिढीसाठी त्याची प्रतिमा आधुनिक करून दाखवली. आपल्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित रोमँटिक नायकालाही पुनरुज्जीवनाची गरज असताना अॅक्शनचा आधार घ्यावा लागतो, याचा अर्थ हा प्रकार बॉलिवूडसाठी किती विश्वसनीय आहे याची खात्री पटते.

रणबीर कपूरचे करिअर कधीच संकटात नव्हते. पण एक गोष्ट निर्विवाद आहे, त्याच्या करिअरला सर्वात मोठा आणि निर्णायक हिट देणारा चित्रपट म्हणजे ‘अ‍ॅनिमल’. रक्तपात, भावनिक गुंतागुंत आणि उफाळून येणारी अ‍ॅक्शन यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटाने रणबीरला त्याच्या करिअरच्या शिखरावर पुन्हा नेऊन ठेवले आणि अॅक्शनद्वारे पुनरागमन करण्याचा हा नियम फक्त आजच्या पिढीपुरताच मर्यादित नाही, तर अमिताभ बच्चन यांनी ‘मर्द’नंतर घेतलेल्या दीर्घ विश्रांतीनंतर आणि जीवघेण्या दुखापतीतून सावरल्यानंतर ‘शहेनशहा’मधून पुनरागमन केले. या अॅक्शन चित्रपटाने त्यांची प्रतिमा नव्याने घडवली आणि त्यांच्या कारकिर्दीतील पडद्यावरील एक अविस्मरणीय रूप घडवले. सनी देओलनेही ‘गदर २’मधून असेच ऐतिहासिक पुनरागमन केले. अॅक्शनचा ठोसा अजूनही करिअरला नवी दिशा देऊ शकतो, याचा तो जिवंत पुरावा ठरला.

शब्दांपेक्षा कृती अधिक प्रभावी

Statista च्या २०२५ मधील सर्वेक्षणात भारतातील ४६०० हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. या सर्वेक्षणानुसार ‘अॅक्शन आणि अ‍ॅडव्हेंचर’ हा भारतीय प्रेक्षकांचा सर्वाधिक पसंतीचा प्रकार ठरला आहे. त्यानंतर लगेच कॉमेडीचा क्रमांक लागतो. हे चित्र स्पष्टपणे दाखवते की, भारतीय प्रेक्षकांच्या भावनिक, सांस्कृतिक आणि सिनेमाच्या आवडीत अॅक्शनपट खूप खोलवर रुजलेले आहेत.

अॅक्शनचा प्रभाव इतका मोठा असण्याचे पहिले कारण म्हणजे त्याला भाषांतराची गरजच नसते. विनोदाप्रमाणे त्याची व्याख्या प्रदेशानुसार बदलत नाही. मुंबई असो किंवा मदुराई एक ठोसा, एक धक्का, एक जोरदार घुस्सा तितक्याच ताकदीने प्रेक्षकांना भिडतो. सूड, न्याय, सामर्थ्य आणि प्रतिकार ही अॅक्शनची मूलभूत भाषा असते आणि ही भाषा भूगोल, भाषा, वर्ग किंवा संस्कृती मानत नाही. तिला ना उपशीर्षकांची गरज असते, ना सूक्ष्म अर्थछटा सांभाळण्याची… तिला फक्त प्रभावाची गरज असते.

अॅक्शनच्या लोकप्रियतेमागे पलायनवादाचा (escapism) ही मोठा वाटा आहे. ज्या देशात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवनच अनेक अडथळ्यांनी आणि संघर्षांनी भरलेले असते…नोकरीतील कटकट, सामाजिक असमानता, व्यक्तिगत असहाय्यता .. पडद्यावर एखादा सर्वशक्तिमान नायक सर्व नियम मोडत, सर्व अडथळ्यांवर मात करत आणि स्वतःच्या बळावर न्याय प्रस्थापित करताना पाहणे ही खोल भावनिक मनोविश्रांती ठरते. त्यामुळे अॅक्शनपट हे फक्त किक देणारे मनोरंजन नसून अनेकांसाठी तो एक भावनिक विसर्ग असतो.

पाश्चिमात्य अॅक्शनपट अनेकदा चमक, शैली आणि तांत्रिक भव्यतेवर भर देतात आणि भावनांना बाजूला ठेवतात. परंतु भारतीय अॅक्शन त्यापेक्षा भिन्न आहे. इथे अॅक्शन मेलोड्रामामध्ये पूर्णपणे भिजलेली असते. आपल्याकडे हिंसा केवळ दृश्यांच्या प्रेक्षणीय भव्यतेसाठी वापरली जात नाही; तर ती अनेकदा वैयक्तिक दु:ख, कुटुंब, सन्मान, प्रेम किंवा नातेसंबंधातील तडे यांच्याशी जोडलेली असते. उदाहरणार्थ, ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट फक्त रक्तपातापुरता मर्यादित नाही; तो वडील आणि मुलातील संघर्ष, पिढ्यान्‌पिढ्यांच्या जखमा आणि नातेसंबंधातील गुंतागुंतीवर तितक्याच ताकदीने प्रकाश टाकतो.

अॅक्शन चित्रपट म्हणजे केवळ कथा नसून एक नाट्यमय सिनेमॅटिक अनुभव असतो. स्लो-मोशनमधून होणारी नायकाची एंट्री, कानठळ्या बसवणारे पार्श्वसंगीत आणि ठोसे पडण्याआधीचा दमदार डायलॉग… या सर्व गोष्टी मोठ्या पडद्यावरच सर्वाधिक जादू निर्माण करतात. अशा “मास मोमेंट्स” खास करूनच प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी तयार केल्या जातात. हे प्रसंग केवळ थिएटरमध्येच वातावरणनिर्मिती करत नाहीत, तर सोशल मीडियावरही वणव्यासारखे पसरतात आणि पॉप कल्चरमध्ये कायम एक अविस्मरणीय नोंद करून जातात. सलमान खानचा ‘वॉन्टेड’मधील “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी…”, शाहरुख खानचा ‘जवान’मधील “बेटे को हाथ लगाने से पहले…”, किंवा शाहिद कपूरचा ‘R… राजकुमार’मधील “सायलेंट हो जा, वरना व्हायोलेट हो जाऊंगा”… हे संवाद आता केवळ सिनेमातील संवद नाहीत; तर ते भारतीय पॉप संस्कृतीतील प्रतिष्ठित लँडमार्क ठरले आहेत.

नायक प्रतिमा महत्त्वाची

भारतात अॅक्शनपटाला मिळणारी अफाट लोकप्रियता केवळ मारामारीच्या थरारामुळे नाही… तर त्यामागे आहे नायकपूजेची संस्कृती आहे. भारतीय सिनेमा फक्त स्टार्स घडवत नाही; तो त्यांना अलौकिक दर्जा देतो. प्रेक्षक चित्रपटातील केवळ पात्र पाहायला जात नाहीत; तर ते पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची पूजा करतात. त्यांची अपेक्षा एकच… नायक करिष्माई असावा, अजिंक्य असावा आणि परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवणारा असावा. अॅक्शनसारखा प्रकार या मिथकाला अधिक वेगात पोसतो, बळकट करतो.

यामुळेच जेव्हा एखादा अभिनेता या अपेक्षांपासून हटतो, तेव्हा प्रेक्षक त्याला साथ देत नाहीत. सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’ (२०१७) हे याचे स्पष्ट उदाहरण. या चित्रपटात त्याने भावनिकदृष्ट्या नाजूक आणि वेगळ्या क्षमतेचा माणूस साकारला… नेहमीच्या ‘भाई’ प्रतिमेपासून अगदी उलट. तो रडतो, चुकतो, अडखळतो आणि इतरांवर अवलंबून असतो. अभिनय प्रामाणिक होता, संदेश मनाला भिडणारा होता. पण प्रेक्षकांना त्यांचा ‘अॅक्शन देव’ इतक्या असहाय्य रूपात पाहणे पटले नाही, परिणामी, बॉक्स ऑफिसवर पराभव झाला. चित्रपटाचा दोष नव्हता; दोष होता प्रेक्षकांच्या मनात उभ्या असलेल्या अढळ श्रद्धाप्रणाली मोडण्याचा. म्हणूनच, साधारण किंवा मध्यम दर्जाचे अॅक्शनपट देखील, फक्त नायकाची प्रतिमा टिकवून ठेवली, तरी यशस्वी ठरतात.

अॅक्शन हा प्रकार फक्त पुरुषांचा एकाधिकार नाही. अनेक अभिनेत्रींच्या करिअरलाही त्याने पुनर्जन्म दिला आहे. राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ (२०१४) आणि त्याचा २०१९ मधील सिक्वेल यांनी तिला रोमँटिक भूमिकांच्या चौकटीतून बाहेर काढत, एक धाडसी, गुन्हेगारांना भीडणारी पोलिस अधिकारी म्हणून पुन्हा नव्याने उभे केले. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले.

अॅक्शनपटाचा दिग्दर्शक असलेल्या आदित्य धर याच्याहाती सूत्रे, आणि संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांसारखा दमदार कलाकारवर्ग आहे. यामुळे हा चित्रपट आधीपासूनच वजनदार ठरतो. पण या सगळ्यांच्या मध्यभागी उभा आहे रणवीर सिंह, त्याच्या लालेलाल, जखमी, भडक आणि आगीसारख्या अवतारात. कारण बॉलिवूडमध्ये एक गोष्ट कायम सत्य ठरते. इतर सारे उपाय फसले तरी, करिअरला संजिवनी देण्यासाठी एकच जॉनर पुरेसा असतो तो म्हणजे अॅक्शनपट! अर्थातच, कारण भारतीय मनाला भावतो तो हा संवाद… ‘घायल हूं, इसलीये घातक हूं!’

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज   …

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया का बयान   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *