Breaking News

छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल

छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंग केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल
महानगरपालिकेच्या फेसबुक संवादमध्ये इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी साधला संवाद

चंद्रपूर, ता. १८ : पावसाचे पाणी आपल्या घराच्या छतावरून पडते. तसेच शेतात पडलेले पाणी सहज वाहून जाते आणि मग नदी-नाल्यांच्या माध्यमातून समुद्रापर्यंत पोहोचते. पण, हेच पाणी बोअरवेल किंवा विहिरीच्या बाजूला त्या ठिकाणी फिल्टर मटेरियल वापरून भूगर्भात सोडल्यास पाण्याची पातळी वाढेल. रेनवाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था प्रत्येकाने करण्याची गरज आहे. त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन स्वच्छतादूत, इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या वतीने विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून “संवाद” या फेसबूक लाइव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शुक्रवारी (ता. १८) ‘रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज आणि महत्व’ या विषयावर चंद्रपूर मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारार्थी, तथा इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी संवाद साधला. यावेळी आकाशवाणीच्या निवेदिका संगीता लोखंडे यांनीही सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, गोंडराज्यांनी पूर्वीच्या चंद्रपूरसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून जंगलातील एक नाला अडवून पाण्याचा साठा तयार केला. त्या ठिकाणी हा रामाळा तलाव बांधला. मग, शहरांमध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण केली. आता येथील पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही. पण, चंद्रपूर शहरांमध्ये एक मात्र शिल्लक राहिलेला तलाव आहे. भूजलाची पातळी कायम राखण्यासाठी हे नैसर्गिक हे वॉटर हार्वेस्टिंगचे काम करते. त्यामुळे शहराच्या मध्यभागी असलेला हा तलाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. चंद्रपूर शहरात पिण्याच्या पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी भुगर्भात पाणी जीरवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर रेनवाॅटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे धोतरे म्हणाले. यावेळी शहरातील नागरिकांनी विचारलेले प्रश्न आणि शंकाचे निराकरण केले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मालमत्ताधारकांना २ हजार ५०० रुपये, वेकोलिच्या सीएसआर फंडातून २ हजार ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तथा पुढील ३ वर्षापर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपल्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा बसविण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन धोतरे यांनी केले.  

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *